दिवाळी आनंदात..

राज्यातील आराखडय़ातील शाळांसाठी वित्त विभागाकडून १४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून २२ हजार शिक्षकांना आता वेळेवर व नियमित वेतन मिळणार आहे. यामुळे या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

राज्यातील खासगी प्राथमिक शाळांसाठी ५४ कोटी ४१ लाख, माध्यमिक शाळांसाठी ३० कोटी ६६ लाख, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी १५ कोटी १ लाख, माध्यमिक शाळांमधील तुकडय़ांसाठी ४२ कोटी ७७ लाख तर सनिकी शाळांसाठी २ कोटी ९८ लाख रुपये असे एकूण १४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील आराखडय़ातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व तुकडय़ा, कनिष्ठ महाविद्यालये व सनिकी शाळांचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी २०१६ पर्यंत नियमित वेतन होणार आहे व त्यापुढेही निधी कमी पडू देणार नसून या सर्व शाळा नॉन प्लानमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करू, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना दिले.
राज्यातील प्लानमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नेहमीच अनियमित होत होते, परंतु सुमारे २२ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होणार असून दिवाळी आनंदात जाणार असल्याचे परिषदेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.