दीपावलीचा उत्सव विविध अंगांनी जीवन प्रकाशमान करत असतो. एका दिव्याने दुसरा दिवा लावत रोषणाई करणे असो किंवा नरकचतुर्दशीच्या दिवशी पायाने राक्षसाचा केलेला प्रतीकात्मक वध असो, दिवाळी खूप काही शिकवत असते. पण या सर्वाच्या पलीकडे जाऊन तरुणांचे विविध गट दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. काही दुर्गम खेडय़ांत जाऊन तेथील लोकांचे आयुष्य प्रकाशमान करण्याचा प्रयत्न असो किंवा गडकिल्ल्यांवर जाऊन साफसफाई करण्याचा उपक्रम असो, समाजाचे देणे पुन्हा समाजाला देण्यासाठी हे तरुण झटत असतात. दीपावलीच्या निमित्ताने अशाच काही गटांची ही ओळख..
‘दंगलीच्या बॅच’चा पराक्रम
सांताक्रूझमधील पोद्दार हायस्कूल ही शाळा अनेकांच्या परिचयाची आहे. या शाळेतून १९९२-९३ या वर्षी दहावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुकडीला ‘दंगलीची बॅच’ अशीच ओळख मिळाली. व्हॉट्सअप आणि फेसबुक यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत या तुकडीतील ६० जण एकत्र आले असून गेली दोन ते तीन वष्रे दिवाळीलाच नाही, तर वर्षभर ते शहापूर तालुक्यातील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम करतात. यंदा या तुकडीने दिवाळीच्या निमित्ताने शहापूर तालुक्यातील बेलवली नावाच्या छोटय़ा गावातील जिल्हा परिषदेची शाळा तेथील मुख्य शिक्षक धीरज डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल केली. हुशार परंतु गरीब घरातील चार मुलींच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्यासाठी त्यांना शैक्षणिकदृष्टय़ा दत्तक घेण्याचे कामही त्यांनी यंदा केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने शहापूरमधील काही गावांत जाऊन फराळ वाटप करणे आणि दिवाळी तेथील मुलांबरोबर साजरी करणे, असा उपक्रम या तुकडीने यंदा राबवला. पुढील वर्षीपर्यंत आणखी एक शाळा डिजिटल करून आणखी मुली शैक्षणिकदृष्टय़ा दत्तक घेण्याचा आमचा बेत असल्याचे पोद्दार हायस्कूलचे माजी विद्यार्थी महेश शिंदे यांनी सांगितले.

‘वेध’ची किल्ले सफाई मोहीम

ठाणे, डोंबिवली-कल्याण या तीन शहरांमधील तरुणांनी एकत्र येऊन काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या वेध या संस्थेतर्फे गेली सात ते आठ वष्रे दिवाळीच्या निमित्ताने किल्ले सफाई मोहीम आखली जाते. सुरुवातीला ट्रेकिंग, त्यानंतर किल्ल्यांवर सहली घेऊन जाणाऱ्या या तरुणांना किल्ल्यांवरील अस्वच्छता खटकू लागली. मग सहलीला गेल्यानंतर आपला कचरा आपण उचलून तो किल्ल्याखाली आल्यावर कचराकुंडीत टाकण्याच्या छोटय़ाशा पावलापासून त्यांची किल्ले स्वच्छता मोहीम सुरू झाली. त्यानंतर वेधमधीलच रवींद्र परांजपे आणि कौस्तुभ जोशी या दोघांच्या डोक्यातून दिवाळी पहाटेला किल्ले स्वच्छता मोहीम ही संकल्पना जन्माला आली. गेल्या सात वर्षांत रायगड, सुधागड, मानगड अशा किल्ल्यांवर या तरुणांनी दिवाळी पहाटेला स्वच्छता मोहीम आणि पणती लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यंदा हे तरुण किल्ले मानगड येथे स्वच्छता मोहिमेसाठी गेले होते. गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे, असे फक्त बोलण्यापेक्षा कृती करण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. ही मोहीम केवळ दिवाळी पहाटेपुरती मर्यादित नसून वर्षभर आम्ही अशा दोन ते तीन मोहिमा काढत असतो, असे रवींद्र परांजपे यांनी सांगितले.

शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई सेंट्रल येथील बीआयटी चाळीतील तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या बाळगोपाळ मित्रमंडळाने गेल्या वर्षीपासून दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचे ठरवले. यंदा या तरुणांनी जव्हार तालुक्यातील रोजपाडा या आदिवासी पाडय़ावर जाऊन त्यांच्यासह दिवाळी साजरी केली. या पाडय़ाबरोबरच आसपासच्या पाडय़ांवरील तब्बल ८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले. यात दप्तर, चपला, वह्य़ा, खाऊचा डबा, रंगीत पेन्सिल, चित्रकलेच्या वह्य़ा आदींचा समावेश होता. तर पाडय़ावरील १२० लोकांना गहू, तांदूळ, साखर, डालडा असा शिधाही देण्यात आला. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकलो, याचा आनंद जास्त आहे, असे बाळगोपाळ मित्रमंडळाच्या धम्रेश म्हैसकर यांनी सांगितले. या उपक्रमासाठी आम्ही चाळीतील सर्वाना साहित्य किंवा पसे अशी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चाळीतूनच नाही, तर आमच्या ओळखीच्या इतरांकडूनही खूप भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘एमडी’ची सामाजिक बांधीलकी
महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ येथील एनएसएसच्या शाखेने समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण इतरांसमोर ठेवले आहे. या शाखेने बदलापूर येथील दहिवली, भोज, धामणवाडी आणि ताडवाडी हे पाडे दत्तक घेतले आहेत. या शाखेचे विद्यार्थी आणि स्वयंसेवक वर्षभर या पाडय़ांवर जाऊन विविध उपक्रम राबवत असतात. दिवाळीच्या निमित्ताने यंदा या विद्यार्थ्यांनी त्या पाडय़ावरील विद्यार्थ्यांना बरोबर घेत गावात व्यसनमुक्त आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रचार केला. त्याचबरोबर घरोघरी उटणे, फराळ आणि आकाशकंदील आदी वाटण्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. या प्रत्येक आकाशकंदिलाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात आला. त्याचप्रमाणे या पाडय़ांवरील विद्यार्थ्यांना मदतीला घेत शाळाही सजवण्यात आली. आम्ही या पाडय़ांवर गेले वर्षभर व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेत आहोत. आधी या पाडय़ांवर व्यसनाधीनतेचे प्रमाण खूप होते. मात्र वर्षभरानंतर आता त्यात ६० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे दिसत आहे. ही आमच्यासाठी नक्कीच दिलासादायक बाब आहे, असे एनएसएस शाखेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश कारंडे यांनी सांगितले. दिवाळीच्या निमित्तानेही आम्ही हाच संदेश या पाडय़ांवर पोहोचवला आहे. त्यांच्यासह दिवाळी साजरी करण्याचा आनंद वेगळाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालिका कर्मचाऱ्यांची बांधीलकी

दळणवळणासाठी रस्ता नाही, वीज नसल्याने दिव्यांचा झगमगाट नाही, हाकेच्या अंतरावर धरण असताना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, अशा अवस्थेत मध्य वैतरणा धरणाजवळच्या घनदाट दुर्गम खेडय़ांमध्ये पिढय़ान्पिढय़ा दारिद्रय़ात खितपत पडलेल्या तब्बल १६० कुटुंबांतील आबालवृद्धांनी पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पुढाकारामुळे अनुभवला दिवाळीचा आनंद. फराळाचा आस्वाद घेत या मंडळींनी दीपोत्सव साजरा केला. त्या वेळी एक विलक्षण आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सावरकूट, सावरडेपाडा, विहीगाव ही मध्य वैतरणा धरणाजवळची घनदाट जंगलाने वेढलेली खेडी. मध्य वैतरणा धरणामुळे विस्थापित झालेले काही ग्रामस्थ याच खेडय़ांच्या आश्रयाला आहेत. कच्च्या रस्त्यावरून ठरावीक अंतरापर्यंत जीपमधून गेल्यानंतर खेडय़ापर्यंत पोहोचण्यासाठी काटय़ाकुटय़ातून वाट काढत पाऊलवाटेने पायपीट करावी लागते. वीज नसल्यामुळे दिव्याचा प्रकाश या ग्रामस्थांच्या नशिबी नाही. मुंबईकरांची वाढती तहान भागविण्यासाठी मध्य वैतरणा धरण उभे राहिले, पण या ग्रामस्थांना साधे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळू नये ही शोकांतिका. इतकेच काय तर कच्च्याबच्च्यांसाठी साधी शाळाही नाही. गेली कित्येक वर्षे या खेडय़ांमधील अनेक कुटुंबे दारिद्रय़ात खितपत पडली आहेत. दसऱ्यानंतर पालिकेच्या प्रत्येक खात्यात, विभागात रंगू लागते दीपोत्सवाच्या कार्यक्रमाची चर्चा. सजावट, भोजनातील पदार्थ निश्चित केले जातात. वर्गणी काढली जाते आणि जमलेल्या निधीतून साग्रसंगीत दीपोत्सव साजरा होतो. तसा कार्यक्रम मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणस्थळांवरील कार्यालयांमध्येही साजरा होतो. पण यंदा मध्य वैतरणा धरणाजवळील जल विभागाने कार्यालयाऐवजी दुर्गम खेडय़ांत ग्रामस्थांबरोबर दिवाळी साजरी करण्याची कल्पना समोर आली आणि त्यावर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. दरवर्षीप्रमाणे वर्गणी गोळा करण्यात आली. जमलेल्या पैशांतून महिलांसाठी साडय़ा, लहान मुलांसाठी कपडे, वृद्धांसाठी ब्लँकेट आदी साहित्य खरेदी करण्यात आले. ठाणे जिल्ह्य़ाच्या वेशीवरचे सावरकूट आणि पालघर जिल्ह्य़ाच्या वेशीवरचे सावरडेपाडा खेडय़ांमधून नदी वाहते. त्यामुळे दिवाळीचा कार्यक्रम सावरकूटमध्ये आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि सोमवारी सावरडेपाडा आणि विहीगावातील ग्रामस्थांनी सोमवारी सावरकूट गाठले. जल विभागातील उपजलअभियंता (प्रचालने) एन. डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (प्रचालने) रमेश मालविय यांच्यासमवेत जल उपअभियंता (प्रचालने) विभागातील अधिकारी-कर्मचारीही रवाना झाले आणि या सर्वानी ग्रामस्थांसमवेत दीपावली साजरी केली. ग्रामस्थांना फराळाचा आस्वाद घडवून दिवाळी भेटींचेही वाटप करण्यात आले. कायम दुर्लक्षित राहिलेल्या या ग्रामस्थांचे चेहरे दिवाळी सोहळ्यामुळे उजळून निघाले.