लोहार चाळ, दादर येथील बाजारपेठा ओस; विद्युत माळा, पणत्या, सजावटीचे साहित्य यांचे विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत

मुंबई : दिवाळी तोंडावर आली की जिथे व्यावसायिकांना दुपारच्या जेवणाचीही उसंत नसते, अशी खास दिवाळीनिमित्त झगमगणारी बाजारपेठ यंदा टाळेबंदी आणि करोनाच्या झळा सोसत आहे. विजेवर चालणाऱ्या माळा, पणत्या, रांगोळी आदींचे विक्रेते यंदा ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. लोहार चाळीतील आणि दादर बाजारात खास दिवाळीसाठी सजावटीचे साहित्य विकणारी दुकाने यंदा ऐन दिवाळीत ग्राहकांविना ओस पडली आहेत. दिवाळीच्या सजावटीसाठी विजेचे चमचमते दिवे, माळा, पणत्या, रंगीबेरंगी आकर्षक बल्ब आदी नवनवीन वस्तूंनी दरवर्षी ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठेत यंदा नावीन्यपूर्ण आणि आकर्षक वस्तूही मर्यादित प्रमाणातच दिसत आहेत.

करोनाने उद्भवलेल्या संकटामुळे गणेशोत्सवाच्या काळात इलेक्ट्रिकल साहित्य विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णत: बुडाला. दिवाळीच्या विक्रीतून झालेला तोटा भरून निघेल या आशेवर हे व्यावसायिक होते. मात्र दिवाळीला केवळ दहा दिवस शिल्लक असतानाही अद्याप म्हणावा तसा ग्राहक फिरकत नसल्याने दुकानदारांची निराशा झाली आहे. गर्दीमुळे क्षणाची विश्रांती मिळणे दुरापास्त असलेल्या लोहार चाळीतील किरकोळ विक्रेते दुकानात बसून असल्याचे चित्र आहे. या काळात दरदिवशी ७० ते ८० हजार रुपयांच्या इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री होत असते. यंदा मात्र ३० हजार रुपयांच्या साहित्याची विक्री करताना नाकीनऊ येत असल्याचे बाळू साळुंखे यांनी सांगितले. हीच व्यथा लोहार चाळीतील श्री समर्थ कृपा या दुकानाचे मालक अण्णासाहेब निवडंगे सांगतात. ‘दिवाळीच्या काळात दरदिवशी दीड ते दोन लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री होते. यंदा ४० हजार रुपयांच्याही वस्तू विकल्या जात नाहीत.

ग्राहकांकडून मागणी नसल्याने यंदा दिवाळीसाठीही निम्म्याहून कमी माल मागविला आहे. दरवर्षी या काळात सुमारे ५० लाख रुपयांचा माल खरेदी केला करत असे. या वर्षी फक्त १५ ते २० लाख रुपयांचा माल घेतला आहे,’ असे अण्णासाहेब यांनी सांगितले. अण्णासाहेब यांच्या दुकानात दहा जण कामाला होते. सध्या फक्त तिघे जण कामाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोहार चाळीतील घाऊक बाजारात खरेदीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह गुजरातमधूनही दुकानदार येत. यंदा मुंबईबाहेरून येणारी मागणी अत्यल्प असल्याचे व्यापारी सांगतात. ग्राहकांची संख्या रोडावली आहे. त्यात खरेदीसाठी ग्राहकांकडून अत्यल्प प्रतिसाद आहे. परिणामी फक्त २० टक्के  नवीन माल खरेदी केल्याची माहिती दादर येथील जनता इलेक्ट्रिकल दुकानाचे मालक आमीन कुरेशी यांनी दिली. यंदा आधी माल घेण्याऐवजी ग्राहकांचा प्रतिसाद पाहूनच मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वेची उपनगरी सेवा बंद असल्याने…

सध्या लोकल रेल्वे सेवेतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांनाच प्रवासाची मुभा आहे. रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली नसल्याने उपनगरातील ग्राहकावर मर्यादा आल्या आहेत. फार थोडे ग्राहक खासगी वाहनाने प्रवास करून खरेदीसाठी दक्षिण मुंबईत येतात. त्यातून ग्राहकांची संख्या रोडावल्याचे या दुकानदारांचे म्हणणे आहे. नोकरकपात आणि पगारकपातीचा परिणामही खरेदीवर झाला असून उत्पन्न घटल्याने नागरिकांकडून खरेदी करताना आखडता हात घेतला जात आहे, असेही हे दुकानदार सांगतात.

विद्युत पणत्यांच्या प्रमाणात घट

दरवर्षी दिवाळीनिमित्त विद्युत पणत्यांची बाजारात रेलचेल दिसे. यंदा मात्र मोजक्याच प्रकारचे आणि तुरळक दुकानातच हे दिवे पाहण्यासाठी मिळत आहेत. बहुतांश दुकानदारांनी वैविध्यपूर्ण साहित्य विक्रीसाठी ठेवण्याऐवजी दुकानात गेल्या वर्षीच्या शिल्लक वस्तूच विक्रीसाठी ठेवल्या आहेत. तसेच घाऊक व्यापाऱ्यांनीही मर्यादित माल मागविला असल्याने हौशी ग्राहकांना वैविध्यपूर्ण वस्तू खरेदी करता येणार नाहीत.