News Flash

आता मुंबई विद्यापीठ दिवाळी अंकाच्या उद्योगात

दिवाळी अंकाच्या या उपक्रमावर टीका होत असली तरी त्याला अद्याप कोणी थेट विरोध केलेला नाही.

वर्षभरात १६० पुस्तके प्रसिद्ध करण्याचा कुलगुरूंचा मानस

गुणपत्रिकांची छपाई वेळेवर होवो वा न होवो, दूरस्थ शिक्षणासाठीची पुस्तके विद्यार्थ्यांना वेळेवर मिळोत अथवा न मिळोत, मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना यंदा कुलगुरूंकडून खास दिवाळी अंकाची भेट मात्र अगदी वेळेवर, म्हणजे ऐन दिवाळीत मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर विद्यापीठाच्या १६०व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून वर्षभरात १६० प्रकाशने प्रसिद्ध करण्याचाही खास बेत कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आखला आहे. यामुळे राजाबाई टॉवरच्या शिरपेचामध्ये आणखी एका लोकप्रिय उपक्रमाचे पीस खोवले जाणार आहे.

विद्यापीठातील काही टीकाखोरांच्या तसेच विद्यार्थी प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, विद्यादान आणि पदवीदान विद्यापीठाचे मुख्य काम असून निकाल लावण्यासाठी लागणारा विलंब, निकाल लागून तीन महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना न मिळणारी गुणपत्रिका, प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ अशा एक ना अनेक समस्यांनी विद्यापीठाला ग्रासले आहे. असे असताना येथे चर्चा होते ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांऐवजी चमको उपक्रमांचीच. दिवाळी अंक हा त्यातलाच एक प्रकार असल्याचे या टीकाकारांचे म्हणणे आहे.

परंतु राजाबाई टॉवरमधील सूत्रांनुसार, विद्यापीठाने दिवाळी अंक काढणे यात काहीही नवलाई नसून यापूर्वी विद्यापीठीय घडामोडींचा आढावा घेणारे ‘विद्यावार्ता’ नावाचे नियतकालिक विद्यापीठातर्फे प्रसिद्ध होत होतेच. ते दीड वर्षांतच बंद पडले असले तरी त्या नामुश्कीतून प्रकाशनाचा एक चांगला अनुभव मिळाला असून त्या बळावरच विद्यापीठाने वर्षभरात १६० प्रकाशने प्रसिद्ध करण्याचा मानस ठेवला आहे.

या संदर्भात कुलगुरू डॉ. देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या १६०व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्या प्रत्येक उपक्रमाचा एक पुस्तकरूपी अहवाल सादर केला जाणार असून या प्रकाशनांची सुरुवात दिवाळी अंकापासून करण्यात येणार आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा असा पहिला दिवाळी अंक असेल, असेही डॉ. देशमुख यांनी अभिमानाने नमूद केले. अद्याप या अंकाच्या नावाची नोंदणी झालेली नाही. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंकाचे शुभनाम जाहीर केले जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. या अंकात विविध क्षेत्रांतील तारांकितांचे लेख असतील.

दिवाळी अंकाच्या या उपक्रमावर टीका होत असली तरी त्याला अद्याप कोणी थेट विरोध केलेला नाही. अधिसभेचे माजी सदस्य सुधाकर तांबोळी यांनीही अंकास विरोध नसल्याचे सांगितले. परंतु विद्यापीठाच्या केंद्रस्थानी असलेल्या विद्यार्थी वर्गाच्या किमान समस्यांची पूर्ती झाल्यानंतर ‘देशमुख आणि कंपनी’ने हा प्रकाशन उद्योग सुरू केला असता तर बरे झाले असते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:31 am

Web Title: diwali issue from mumbai university
Next Stories
1 मुकूल निकाळजे आणि शिवानंद बुटले ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
2 माथाडींच्या ‘स्वयंभू’ संघटनांमुळे औद्योगिक शांतता धोक्यात!
3 मुंबई ते पुणे प्रवासासाठी ‘ओला’कडून ८३ हजारांचे देयक
Just Now!
X