टेक्नॉलॉजीचा वापर होऊन दिवाळी अंक विविध रूपांमध्ये दिसू लागला. छापील दिवाळी अंकांची ई-आवृत्ती निघू लागली. पण आता दिवाळी अंक थेट अँड्रॉइड अॅपवर प्रसिद्ध झाला आहे. काही तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कंपनीच्या माध्यमातून हा दिवाळी अंक तयार करण्यात आला असून तो केवळ अँड्रॉइड अॅपवरच उपलब्ध आहे.
या अंकामध्ये तरुणाईशी संबंधित लेख असून हे सर्व लेख हौशी लेखकांनी लिहिलेले आहे. आपल्या व्यावसायिक कार्यामधून थोडासा वेळ बाजूला काढून आपल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने काही तरी वेगळे आणि सांस्कृतिक देण्याचा प्रयत्न वेदांत आयटी अकादमीचे प्रणीत मोरे, स्वप्निल गोंदकर आणि मयुरेश नाईक या तिघांनी केला आहे. या तिघांनी हे अॅप तयार केले असून यामुळे आपल्याला मोबाइलवर दिवाळी अंक वाचता येणार आहे. ‘तरुणाई’ असे या दिवाळी अंकाचे नाव असून यामध्ये १५ कथा आहेत. हा अंक अगदी मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. यात काही विनोद, कविता यांचाही समावेश आहे. यामुळे हौशी तरुणांनी तयार केला असला तरी हा अंक वाचनीय आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यावर काही तरी नवीन करायच्या उद्देशाने या तरुणांनी स्वत:ची एक कंपनी स्थापन केली असून त्या माध्यमातून ते प्रशिक्षणही देतात. यंदाही दिवाळी टेकसॅव्ही करायच्या उद्देशाने त्यांनी दिवाळी अंकासह एकूण सहा दिवाळी विशेष अॅप्लिकेशन्स अँड्रॉइड बाजारात आणले आहेत. यामध्ये ट्रेडिशनल दिवाळी, दिवाळी सेफ्टी टिप्स, दिवाळी एसएमएस, दिवाळी वॉलपेपर आणि दिवाळी फराळ या चार अॅप्सचाही समावेश आहे. यातील ट्रेडिशनल दिवाळी या अॅपमध्ये दिवाळी सणाविषयीची सर्व माहिती देण्यात आली असून त्यात सणाच्या पद्धतींचाही उल्लेख करण्यात आला आहे. तर सेफ्टी टिप्स या अॅपमध्ये दिवाळीनिमित्त आवश्यक अशा सुरक्षा टिप्स देण्यात आल्या आहेत. दिवाळीचे फॉवर्डेड एसएमएस लोकांना पाठवण्यापेक्षा स्वत:चे खास मेसेजेस पाठवता यावेत यासाठी दिवाळी एसएमएस हे अॅप उपयुक्त ठरणार असून वॉलपेपर हे अॅपही शुभेच्छापत्र पाठविण्यासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. महिलांना मोबाइलमध्ये पाककृती वाचता यावी यासाठी दिवाळी फराळ हे अॅप उपयुक्त ठरणार आहे. कोणताही व्यवसाय म्हटला की, व्यासायिकता ही येतेच पण याचबरोबर आपली संस्कृती जपण्यासाठी म्हणून यंदा आम्ही हा ‘अॅप’प्रपंच थाटल्याचे स्वप्निल गोंदकर सांगतो.