दूरदृश्य प्रणालीद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा अनेक संस्थांचा निर्णय; आंतरराष्ट्रीय प्रेक्षक लाभण्याची संधी

मुंबई : करोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर आलेले र्निबध लक्षात घेऊन यंदा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाचा आनंद आभासी कार्यक्रमात मिळत नसल्याने प्रेक्षकांच्या प्रतिसादाबाबत काही आयोजक साशंक आहेत, तर काहींनी आभासी कार्यक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी साधली आहे.

‘ग्रंथाली’ प्रकाशनने ‘गगन सदन तेजोमय’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच के ले. ‘पत्रास कारण की’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. काही नामवंत व्यक्तिमत्त्वांनी लिहिलेल्या पत्रांचे वाचन करून त्यावर आधारित गाणी सादर करण्यात आली. यात सुनीताबाई देशपांडे यांनी जी. ए.

कु लकर्णी यांना लिहिलेले पत्र, लोकमान्य टिळकांनी त्यांच्या मुलांना लिहिलेले पत्र, पु. ल. देशपांडे यांनी गंगाराम गवाणकर यांना ‘वस्त्रहरण’बाबत लिहिलेले पत्र यांचा  समावेश आहे.

संगीतकार प्रभाकर जोग यांनी आपल्याला सुचलेली चाल लिहून यशवंत देव यांना पाठवली. त्यावर देव यांनी शब्द पाठवले. यातून ‘स्वर आले दुरून’ या गाण्याची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गडावर आमंत्रित के ल्यानंतर तुकारामांनी त्यांना एका अभंगातून उत्तर दिले. या गाण्यांचे सादरीकरणही कार्यक्रमात के ले जाणार आहे. दिवाळीच्या दिवशी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होईल. ग्रंथालीच्या दिवाळी अंक संचासाठी नोंदणी करणाऱ्यांना या कार्यक्रमाची लिंक दिली जाईल.

पुण्याच्या ‘स्वरझंकार’तर्फे  आभासी संगीत मैफिलीला ७४ देशांतून ७ हजार रसिक प्रतिसाद देतात. त्यामुळे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास संस्थेला वाटतो. हा पूर्वचित्रित कार्यक्रम  http://www.swarazankarhub.com  या लिंकवर १४ नोव्हेंबरला पाहाता येईल.  ठाण्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान’तर्फे  आयोजित ‘तिहाई’ हा कार्यक्रम ४५ देशांमध्ये थेट प्रक्षेपित होणार आहे. यशवंत देव, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर यांच्या गीतांवरील कार्यक्रम https://www.ticketkhidakee.com/tihaee  या लिंकवर १४ नोव्हेंबरला सकाळी ६.१५ वाजता पाहाता येईल. ‘जीवनगाणी’तर्फे ही विलेपार्ले, वांद्रे येथे ‘दिवाळी पहाट’चे आयोजन यंदा आभासी पद्धतीने होणार आहे.

दिवाळी अंकांचा संच २०४९ रुपये कि मतीला

ऋतुरंग, अंतर्नाद, पद्मगंधा, शब्दरुची, मौज या दिवाळी अंकांचा मूळ २०४९ रुपये कि मतीचा संच ‘ग्रंथाली’तर्फे  मुंबईतील वाचकांना १ हजार रुपयांत तर, मुंबईबाहेरील वाचकांना ११०० रुपयांत मिळेल. ९२२३४६६८६० या क्रमांकावर ५ नोव्हेंबपर्यंत नोंदणी करणाऱ्या वाचकांना अंक घरपोच दिला जाईल. तसेच ‘स्टोरी टेल’ची मराठी, हिंदी, इंग्रजी श्राव्य पुस्तके  तीन महिने मोफत ऐकण्यासाठी एक सांके तांक (कोड नंबर) दिला जाईल.

सरकारच्या निर्णयाकडे डोळे

काही संस्था मात्र कार्यक्र म सभागृहात घ्यायचा की ऑनलाइन या संभ्रमात आहेत. गेली २५ वर्षे अव्याहतपणे ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्र म करणाऱ्या ‘चतुरंग प्रतिष्ठान’ची यंदा काव्यमैफल अथवा स्मरणकाव्य आयोजिण्याची योजना आहे. चतुरंगतर्फे  गिरगाव, विलेपार्ले, ठाणे, डोंबिवली या परिसरात कार्यक्र म आयोजित के ले जातात. पण यंदा के वळ तीन के ंद्रावरच कार्यक्र म करण्याचा विचार आहे, अशी माहिती कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी दिली. अर्थात राज्य सरकारच्या परवानगीनंतर याबाबत अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. डोंबिवली येथील ओमकार कला मंडळाचे आयोजक दुर्गराज जोशी हेही राज्य सरकारच्या घोषणेची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांचा नगण्य प्रतिसाद असल्याने ऑनलाइन कार्यक्र म करणार नसल्याचे ते म्हणाले.