25 November 2020

News Flash

करोनामुळे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाच्या मानधनात घट

ऑनलाइन कार्यक्रमांमुळे प्रायोजकत्व मिळण्यात अडचणी

गायक वादकांना आर्थिक फटका; ऑनलाइन कार्यक्रमांमुळे प्रायोजकत्व मिळण्यात अडचणी

मानसी जोशी- नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : करोना संसर्गाचा धोका असल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे यंदाचे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केले जाणार आहेत. मात्र या ऑनलाइन कार्यक्रमांना पुरेसा प्रेक्षकवर्ग मिळत नसल्याने प्रायोजकत्व मिळण्यास अडचणी येत आहेत. याचा फटका कार्यक्र म सादर करणाऱ्या गायक आणि वादकांना बसत असून त्यांच्या मानधनात यंदा कपात झाली आहे.

दरवर्षी दिवाळीच्या साधारण एक महिना आधीपासून ‘दिवाळी पहाट’च्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. या कार्यक्रमांना मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यामुळे आयोजकही चांगले मानधन देऊन कलाकारांना सहभागी करून घेत असतात. मात्र गेल्या सात महिन्यांपासून राज्यात करोनाचे संकट ओढवल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. राज्यात करोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकार टाळेबंदीत शिथिलता आणत आहे. त्यामुळे निदान दिवाळीपर्यंत तरी कार्यक्रम करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा कलाकारांना होती. मात्र सरकारने अद्यापही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहेत. अर्थात या कार्यक्रमांना प्रायोजकत्व मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी आयोजकांनी गायक आणि वादकांच्या मानधनात निम्म्याहून अधिक कपात केली आहे.

‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम ऑनलाइन व्हावे, असे कोणत्याही कलाकाराला वाटणार नाही, कारण प्रत्यक्ष सादरीकरणाचा अनुभव वेगळाच असतो. पहाटे रसिक प्रेक्षक नटून-थटून कार्यक्रमाला येतात. कलाकारांना मनमुराद दाद देतात. हे वातावरणच वेगळे असते,’ अशी प्रतिक्रिया गायक अजित परब यांनी दिली. पण सध्या पर्याय नसल्याने कार्यक्रम ऑनलाइन करावा लागत आहे. मर्यादित प्रेक्षकांना बोलवून कार्यक्रम करू, असा आग्रह काही आयोजक धरतात. मात्र ते शक्य नाही. एखाद्या एक हजार प्रेक्षकक्षमतेच्या सभागृहात ५०० प्रेक्षकांनाच तिकीट देऊन बसवल्यास आयोजकांचेही नुकसान आहे. या सगळ्यात कलाकारांचे मानधन एरवीच्या तुलनेत ३०-४० टक्क्यांनी घटले आहे. मात्र कार्यक्रमाच्या गुणवत्तेत तसूभरही कमतरता आलेली नाही,’ असे गायक अजित परब यांनी सांगितले.

पुण्यातील प्रतीक राजकुमार दिवाळीच्या पहिल्या दिवशी दरवर्षी गायनाचे कार्यक्रम करतात. सकाळचे राग ऐकण्याची मजा वेगळीच असते. पुणेकर प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळते. ती यंदा मिळणार नाही. तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम करत असताना सलग गायन के ले जाते. ऑनलाइनसाठी चित्रीकरण करताना तसे होत नाही, असे त्यांनी सांगितले. परंतु चांगल्याप्रकारे प्रसिद्धी मिळवून दिली तर ऑनलाइन कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे त्यांना वाटते.

डोंबिवलीला राहणारे विश्वनाथ आणि सीमा शिरोडकर या वादनाचे कार्यक्र म सादर करणाऱ्या दाम्पत्यालाही प्रेक्षकांकडून मिळणारी थेट दाद महत्त्वाची वाटते. त्यामुळे ऑनलाइन कार्यक्रमांना किती प्रेक्षकवर्ग लाभेल, याबद्दल साशंक असल्याचे विश्वनाथ शिरोडकर सांगतात.

प्रत्यक्ष कार्यक्रम सहकलाकारांसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत असतो. ऑनलाइन कार्यक्रमामुळे त्यांना काही प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे.

प्रतीक राजकु मार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 1:12 am

Web Title: diwali pahat event honorarium decrease due to coronavirus zws 70
टॅग Diwali
Next Stories
1 अनावश्यक तरतुदींमुळे आरोग्य बिघाड
2 न बांधलेल्या घरांची सोडत लांबणीवर
3 मराठीतील दुर्मीळ ग्रंथ संगणकीकरणाच्या कामाला वेग
Just Now!
X