12 November 2019

News Flash

दिवाळीत एसटीची भाडेवाढ?

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत प्रस्ताव अडकला

(संग्रहित छायाचित्र)

एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ यंदाही लागू होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भाडेवाढीचा प्रस्ताव सध्या थांबलेला आहे. भाडेवाढ लागू झाल्यास ती १० टक्के असेल, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. परंतु दिवाळी अगदी जवळ असतानाच अचानक होणाऱ्या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या रोषालाही सामोरे जावे लागू शकते.

खासगी ट्रॅव्हल्सकडून दिवाळीत भाडेवाढ करून चांगलीच कमाई केली जाते. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्य़ांपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षी एसटी महामंडळ दिवाळी हंगामात तात्पुरती भाडेवाढ करते. दरवर्षी साधी, निमआराम, वातानुकूलित बससेवा प्रकारांनुसार १०, १५ आणि २० टक्के भाडेवाढ महामंडळाकडून केली जात होती. परंतु प्रवाशांच्या खिशाला लागणारी मोठी कात्री पाहता गेल्या वर्षांपासून सरसकट १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली. गेल्या वर्षी दिवाळीत १ ते २० नोव्हेंबपर्यंत भाडेवाढ लागू केल्याने चांगलीच कमाई झाली होती.

यंदाही एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा विचार आहे. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता यामुळे भाडेवाढ लागू करावी की नाही या विचारात महामंडळ आहे. २१ ऑक्टोबरला मतदान असून त्यानंतरच निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन भाडेवाढ तत्काळ लागू करावी, यावर सध्या महामंडळात चर्चा सुरू आहे. २४ ऑक्टोबरला मतमोजणी असून २५ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. दिवाळीचा जोर हा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडात अधिक असतो. त्यामुळे या काळात एसटीकडून जादा गाडय़ाही सोडल्या जातात. त्यामुळे उत्पन्न मिळवण्याची हीच संधी महामंडळासमोर असते. मात्र दिवाळीनिमित्त एसटी गाडय़ांचे आरक्षणही आधीच झालेले आहे. अशातच भाडेवाढ केल्यास एसटीला प्रवाशांच्या रोषालाही सामोरे जावे लागेल.

यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

निवडणुकीत एसटीच्या दहा हजार गाडय़ा आरक्षित

निवडणुकीसाठी २१ आणि २२ ऑक्टोबरला एसटीच्या एकूण १० हजार गाडय़ा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याचा फटका महामंडळाला काही प्रमाणात बसू शकतो. २१ ऑक्टोबरपेक्षा २२ ऑक्टोबरला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

सानुग्रह अनुदानाचीही लवकरच घोषणा : एसटीच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सानुग्रह अनुदानाचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये, तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळाले होते. नुकतीच दहा हजार रुपये आगाऊ रक्कमही देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

First Published on October 21, 2019 12:46 am

Web Title: diwali sts rent increase abn 97