सुरतवरून तयार होऊन आलेल्या पणत्यांना बाजारात मागणी

दिवाळीच्या तोंडावर दादर, बोरीवली, जोगेश्वरी येथील बाजारपेठा रंगीबेरंगी कंदिल, पणत्या, दिव्यांनी झळाळल्या असून यात गुजरातमधील सूरतेतून आलेले कलाकुसरीचे दिवे भाग खाऊन जात आहेत.

नवरात्रोत्सवात किंवा लग्नसराईच्या काळात मुंबईतील अनेक दुकानात मोठय़ा प्रमाणात सूरतच्या बाजारपेठेतून कपडे, साडय़ा, आभुषणे विक्रीला येत असतात. त्यात यंदा दिवाळीच्या तोंडावर सुरतमधील कारागीरांनी मातीत घडविलेल्या कलाकुसरीच्या खूब‘सूरत’दिव्यांची भर पडली आहे.

कासव, गणपती, हत्ती अशा विविध आकारात हे दिवे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे मातीचे हे दिवे दिसायलाही आकर्षक आहेत. या दिव्यांना रंगांबरोबरच टिकल्यांच्या कलाकामाने सजविण्यात आले आहे. वेगवेगळ्या आकारातील या दिव्यांकडे ग्राहक आकर्षित न होतील तरच नवल!

मुंबईतील धारावी भागात कुंभारवाडय़ात दिवाळीत पणत्या, दिवे बनविण्याच्या कामाला वेग येतो. मात्र, यंदा इथल्या कारागीरांना सुरतेहूनही आकर्षक दिवे मुंबईत विक्रीकरिता म्हणून आणले आहेत. सामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरात हे दिवे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना निश्चितपणे मागणी येईल, अशी अपेक्षा विक्रेते व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांतून स्वदेशीचा नारा सुरू आहे.

दिवाळीत सजावटीकरिता अनेकदा चायनीज वस्तूंना पसंती दिली जाते. परंतु, या वर्षी देशी बनावटीच्या वस्तूंनीच दिवाळी साजरी करा, अशा अर्थाच्या प्रचाराने या पणत्यांना मागणी असेल, असे विक्रेत्यांना वाटते आहे.

गेल्या काही दिवसांत या नवीन मोठय़ा पणत्या सूरतहून बाजारात आल्या आहेत. नेहमीच्या पणत्यांपेक्षा या पणत्या जास्त काळ जळतात. त्या इतक्या आकर्षक आहेत की दिवाळी नंतरही त्यांचा वापर शोभेच्या वस्तूप्रमाणे करता येऊ शकतो. या पणत्यांची किंमत २५० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत आहेत. महत्वाचे म्हणजे हे दिवे कमी तेलात जास्त वेळ जळू शकतात.

– अरुणा सोनावणे, पणत्या विक्रेत्या.