“राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही.” असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज रोखठोक सदरातील लेखाद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर हे आक्रमक झाले असून, त्यांनी थेट “देशातील फुटरतावादी प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारं लिखाण केल्याबद्दल संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा” अशी मागणी केली आहे.

“संजय राऊत यांनी आज रोखठोक सदरातून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. देशामध्ये विभाजनवादी प्रवृत्ती वाढत आहेत आणि रशिया प्रमाणे राज्य फुटून निघतील. अशा स्वरूपाचं देशद्रोही वक्तव्यं त्यांनी आज आपल्या लेखातून केलं आहे. त्यांनी एवढं देखील भान नाही, राज्य फुटली ती रशियातून नव्हे सोव्हिएत यूनियनमधून. पण ज्या काँग्रेसने देशाची फाळणी केली. तुकडे तुकडे गँगचं समर्थन केलं. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर राऊतांना असे देशद्रोही विचारच सुचणार. माझी तर केंद्र सरकारकडे मागणी आहे, देशातील फुटरतावादी प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारं लिखाण केल्याबद्दल संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मी करतो आहे.” असं भातखळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून म्हटलं आहे.

तसेच, “शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात भारतातील राज्यही रशिया सारखी फुटतील…त्यांना मला सांगावेसे वाटते की हा देश हिंदुत्वाच्या मजबूत धाग्यांनी बांधला गेलाय. तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका…” असं देखील भातखळकर यांनी म्हटलेलं आहे.

तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असेल, पण…; भातखळकरांनी शिवसेनेला सुनावलं

तर, “मावळत्या वर्षाने महागाई, बेरोजगारी, आर्थिक डबघाई, निराशा, वैफल्याचे ओझे उगवत्या वर्षावर टाकले आहे. सरकारकडे पैसा नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहेत. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे. बिहारात निवडणूक झाल्या. तेथे तेजस्वी यादव यांनी मोदी यांच्याशी टक्करच घेतली. बिहारचे नितीशकुमार व भाजपाची सत्ता प्रामाणिक मार्गाने आली नाही. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विशेष प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजपाचेच नेते विजय वर्गीय यांनी केला. राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसे व्हायचे? पंतप्रधान देशाचे आहेत. संघराज्य बनून देश उभा आहे. ज्या राज्यांत भाजपाची सरकारे नाहीत ती राज्येही राष्ट्राशीच नाते सांगतात, हा विचार मारला जात आहे,” असं संजय राऊत यांनी रोखठोक सदरातील लेखाद्वारे म्हटलेलं आहे.