विनोद तावडे यांची मागणी
तब्बल तीन महिने विद्यार्थी आणि सरकारला वेठीस धरणाऱ्या प्राध्यापकांचे संपकाळातील वेतन कापण्यास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी विरोध केला आहे. या प्राध्यापकांचे वेतन कापू नका, अशी विनंती त्यांनी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना केली आहे.
सहाव्य वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनवाढीतील थकबाकी मिळावी यासाठी प्राध्यापक संघटनेने बेमुदत संप पुकारला होता. राज्य सरकारची या प्राध्यपकांना वेतनातील सर्वच्या सर्व थकबाकी देण्याची तयारी होती. परंतु नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांनाही सुधारित वेतनश्रेणी व त्यानुसार मिळणारी वाढ मिळायला हवी या एका मागणीवर प्राध्यपक अडून बसले होते. शेवटी सरकारने कायद्याचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आणि न्यायालयानेही खडसावल्याने प्राध्यपकांना अखेर संप मागे घ्यावा लागाला. परंतु संप काळातील प्राध्यपकांना वेतन देण्यात येणार नाही, असे सरकारने जाहीर केले आहे. त्याला आता विरोधी पक्ष नेत्यानेच विरोध केला आहे.
कोणताही संप दुर्दैवीच असतो. प्राध्यापकांच्या संपाबाबतही तेच घडले. मात्र शासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळेच हा संप चिघळल्याचा आरोप तावडे यांनी केला आहे. दुसरे असे की संपावर जाण्यापूर्वी प्राध्यपकांनी परीक्षेचे काम पूर्ण केले होते आणि आता ते पेपर तपासण्याचे कामही करणार आहेत. याचा अर्थ त्यांच्यावरील जबाबदारी ते पार पाडणार आहेत. त्यामुळे त्यांचे वेतन कापण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना केली आहे.