संदीप आचार्य 
मुंबई: पालिकेच्या शीव रुग्णालयात करोनाच्या रुग्णाच्या मृतदेहांचे घाणेरडे राजकारण विरोधी पक्षाचे काही लोक करू पाहात आहेत. करोनाच्या मृतांचे राजकारण करून मृतांना व उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अपमानित करू नका, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मृतदेह काही दिवस पडून आहेत असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते तर शीव रुग्णालयात एका मृतदेहाशेजारच्या खाटेवर दुसरा रुग्ण असून परिचारिका तशाच परिस्थितीत रुग्णावर उपचार करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच भाजपाच्या काही नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काही आक्षेप उपस्थित केले आहेत. याकडे लक्ष वेधून करोनाच्या लढाईत डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी आपल सर्वस्व पणाला लावून रुग्णांवर उपचार करत असताना किमान वस्तुस्थिती समजून घेऊन नंतरच योग्य ती टीका करणे अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

“किमान सभ्यता पाळायलाही विरोधीपक्ष तयार नसेल तर असले घाणेरडे राजकारण मी सहन करणार नाही, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर व परिचारी तसेच अन्य कर्मचारी करोनाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत आहेत. करोनाचा अथवा अन्य कोणत्याही आजाराचा रुग्ण असला तरी पालिका रुग्णालयात उपचाराचा यज्ञ सुरु आहे. पालिका रुग्णालयातील अनेक डॉक्टर व परिचारिकांना करोनाची लागण होत आहे. अनेक आरोग्य कर्मचारी क्वारंटाइन होत आहेत तरीही कोणी रुग्णोपचाराच्या व्रतापासून इंचभरही हललेला नाही. एका निष्ठेने सारी यंत्रणा रुग्णांची सेवा करत आहेत” असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

“काही रुग्णांचे मृत्यू होतात तेव्हा नातेवाईकांना कळवण, मृतदेह अन्यत्र हलवणे, मॉर्गमध्ये जागेची व्यवस्था करणे व त्यासाठी लागणार्या मनुष्यबळाची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी थोडा वेळ लागणारच. अशावेळी शेजारी असलेल्या रुग्णाला औषध देणे तसेच धीर देण्याचे काम एखादी परिचारिका व डॉक्टर करत असले तर ‘मृतदेहाशेजारी रुग्णावर उपचार’ अशा प्रकारचा व्हिडिओ काढणे हा गंभीर गुन्हा तर आहेच पण त्याच्या आधारे जर विरोधक टीका करणार असतील तर ते त्याहून गंभीर गुन्हेगार आहेत” असा रोखठोक प्रहार आरोग्यमंत्री टोपे यांनी केला.

“निश्चित काही अडचणी आहेत. मी अधिष्ठात्यांकडून माहिती घेतली. काहीवेळा रुग्णवाहिका मिळायला वेळ लागतो. त्याचीही वेगवेगळी कारणे आहेत. कधी नातेवाईक क्वारंटाइन असतात आणि भीतीपोटी मृतदेह न्यायला शेजारी पाजारी येत नाहीत. काहीवेळा मृतदेह अन्यत्र हलणारे कर्मचारी दुसरीकडे अशाच कुठल्या कामात गुंतलेले असू शकतात. मात्र कोणतीच वस्तुस्थिती समजून न घेता महापालिका रुग्णालयात स्वत: च्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर व पकिचारिकांसह संपूर्ण रुग्णलयालाच बदनाम करून वेठीला धरायचा हे कुठलं राजकारण आहे. असा जळजळीत सवालही राजेश टोपे यांनी केला. किमान कोणतेही आरोप करण्यापूर्वी आमचे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना काय वाटले असेल याचा तरी विचार विरोधी पक्षाच्या लोकांनी टीका करण्यापूर्वी करायला हवा होता” असेही टोपे म्हणाले.

शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांना याबाबत विचारले असता ही घटना नेमकी कधी घडली याची माहिती घेण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एखाद्या रुग्णाचा वॉर्डात मृत्यू होतो तेव्हा आजुबाजूला रुग्ण असतात. आम्ही तात्काळ मृतदेह हलवण्यासाठी कर्मचारी बोलावतो. दरम्यानच्या काळात शेजारील रुग्ण घाबरला असल्यास त्याला धीर देण्याचे काम डॉक्टर व परिचारिका एरवीही करतात. करोनाच्या रुग्णांबाबत अधिक काळजी घ्यावी लागते कारण असे रुग्ण आधिच घाबरलेले असतात, असेही डॉ प्रमोद इंगळे म्हणाले. आमचे सर्व डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारा आजच्या अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत आहेत. शीव रुग्णालयात करोनाशी सामना करताना आमचे शंभरपेक्षा जास्त डॉक्टर व कर्मचारी आज क्वारंटाईन आहेत. अशावेळी कोणी शीव रुग्णालयाबाबत राजकारण करू नये एवढीच आमची अपेक्षा असल्याची भावना अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी व्यक्त केली.