राज्याकडून ‘एआयसीटीई’ला विनंती

अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील रिक्त जागांच्या ससेमिऱ्याला वैतागलेल्या राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने राज्यात कोणत्याही नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी देऊ नये, असे पत्र अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) पाठवले आहे. त्याच वेळी यापुढे राज्यातील नवी अभियांत्रिकी महाविद्यालये ही तंत्रशिक्षण विद्यापीठाशीच संलग्न करण्याचे संकेतही या पत्रातून देण्यात आले आहेत.

देशभरातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे नियमन एआयसीटीई करते. नव्या महाविद्यालयाला परवानगी देणे, महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणे हे सगळे एआयसीटीईच्या मंजुरीने होते. राज्यातील वाढलेली अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थ्यांचा कमी होत जाणारा प्रतिसाद यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा गेल्या अनेक वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात रिक्त राहात आहेत. या पाश्र्वभूमीवर यंदा राज्यात नव्याने कोणत्याही अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाला परवानगी देण्यात येऊ नये असे पत्र राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने एआयसीटीईला दिले आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या जवळपास पन्नास टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. शासकीय आकडेवारीनुसार पदविका अभ्यासक्रमाच्या २०१५-१६ मध्ये ४८.३४ टक्के, २०१६-१७ मध्ये ५५.९४ टक्के आणि २०१७-१८ मध्ये ५६.६४ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या २०१५-१६ मध्ये ४२ टक्के, २०१६-१७ मध्ये ४४.७८ टक्के आणि २०१७-१८ मध्ये ४०.८७ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती विभागाने केली आहे.

येत्या काळात नव्याने अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करायची झाल्यास ती लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न करण्याचा विचारही तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.