मुंबई महापालिकेचा पवित्रा; नागरिकांच्या सहकार्यातून धडा शिकवणार
कमला मिल अग्नितांडवानंतर बांधकाम आणि अग्निसुरक्षेविषयीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या हॉटेलांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास मुंबई पालिकेने सुरुवात केली आहे. मात्र कारवाईनंतर हॉटेलांमध्ये पुन्हा बेकायदा बांधकामे केली का यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणाच पालिकेकडे नाही. मुळात मनुष्यबळाअभावी पालिकेला ते शक्य नाही. परिणामी, बांधकामविषयक नियम आणि अग्निसुरक्षा पायदळी तुडविणाऱ्या हॉटेल्समध्ये ग्राहकांनी जाणे टाळावे. तोटा होऊ लागताच हॉटेलमालक ताळ्यावर येतील आणि हॉटेल्समधील अनियमिततेचा प्रश्न सुटु शकेल. हे केवळ नागरिकांच्या सहकार्यातूनच होऊ शकते, असा पवित्रा पालिकेने घेतला आहे.
नववर्षांच्या स्वागतासाठी जंगी कार्यक्रमाचे मनसुभे रचले जात असतानाच २९ डिसेंबर रोजी परळ परिसरातील कमला मिलमधील दोन रेस्टोपबमध्ये अग्नितांडव झाले आणि १४ जणांचा बळी गेला. त्यामुळे मुंबईतील हॉटेलांमधील अनधिकृत बांधकाम आणि अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालिकेने मुंबईमधील हॉटेलांमध्ये तपासणीचक्र सुरू केले आहे. पालिकेने आतापर्यंत तब्बल चार हजार ५८८ हॉटेलांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान हॉटेलमधील अग्निप्रतिबंधक उपाययोजना, अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यात येत आहे. पालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये तब्बल १३४० हॉटेलांमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याचे निदर्शनास आले. ही अनधिकृत बांधकामे पालिकेने तोडून टाकली. तसेच मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करणाऱ्या आणि अग्निसुरक्षाविषयक नियम पायदळी तुडविणाऱ्या ७९ हॉटेलांना पालिकेने टाळे ठोकले. तर अग्निप्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तब्बल एक हजार ८५५ हॉटेलांच्या मालकांविरुद्ध पालिकेने न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर हॉटेल्समध्ये अनधिकृतपणे अधिक गॅस सिलिंडरचा साठा करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असून या कारवाईमध्ये सुमारे दोन हजार १७२ गॅस सिलिंडरही जप्त करण्यात आले आहे.
पालिकेने हॉटेलांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयांतील अधिकारी दररोज हॉटेलांची पाहणी करून कारवाई करत आहेत. मात्र कारवाई केलेल्या हॉटेलांमध्ये पुन्हा अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा पालिकेकडे नाही. या कामासाठी मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असून तेवढे मनुष्यबळ पालिकेकडे नाही. मोठय़ा प्रमाणावर केलेली अनधिकृत बांधकामे आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यात होणारी टाळाटाळ यामुळे मुंबईमधील अनेक हॉटेलांमध्ये मृत्यूचे सापळे बनले आहेत. आता नागरिकांनीच सजग होऊन अशा हॉटेलांमध्ये जाणे टाळावे, तसेच अशा हॉटेलांबाबत पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये तक्रार करावी, असा पवित्रा पालिकेने घेतला आहे. दाटीवाटीची आसन व्यवस्था आणि आपत्कालीनसमयी बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दरवाजाची व्यवस्था नसलेल्या, तसेच नियम धाब्यावर बसविण्यात आलेल्या हॉटेलमध्ये जाणे नागरिकांनीच टाळले तर हॉटेलमालकांना वचक बसू शकेल. भविष्यात मालकांना हॉटेलमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना आणि नियमानुसारच बांधकाम करावे लागेल, असे पलिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
वाहतूक पोलिसांना प्रत्येक सिग्नलवर पोलीस अधिकारी आणि हवालदार तैनात करणे शक्य नाही, तसेच मुंबईतील प्रत्येक हॉटेलवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकाम असलेल्या आणि अग्निसुरक्षेची काळजी न घेणाऱ्या हॉटेलांमध्ये ग्राहकांनी जाऊ नये. तरच नियम धाब्यावर बसविणाऱ्या हॉटेलमालकांना आपसूकच वेसण बसेल.
– अजोय मेहता, पालिका आयुक्त
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2018 1:59 am