शासकीय रुग्णालयात दाखल करोनाबाधितांवर उपचार करण्याच्या अटीवर औरंगाबाद येथील डॉक्टरला उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला. बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात हा डॉक्टर कारागृहात होता.

सुरज राणा असे या डॉक्टरचे नाव आहे. त्याने केलेल्या जामीन अर्जावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. राणा याने जामिनाची मागणी करताना आपण  सध्याच्या करोनाच्या पाश्र्वभूमीवर गरजू लोकांना मदत करू, असे आश्वसित केले होते.

राणा याने अर्जात जे आश्वासन दिले आहे ते पाहता आणि सध्या राज्यात करोनामुळे जी स्थिती झाली ती लक्षात घेता त्याला तात्पुरता जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे राणा याने जामिनावर सुटका झाल्यानंतर औरंगाबाद शासकीय रुग्णालयाच्या अधीक्षकांची भेट घ्यावी . तसेच ते जे काही आदेश देतील त्यानुसार काम करण्यास आपण तयार असल्याचे हमीपत्र द्यावे, असेही न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना नमूद केले आहे.

न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत जामीन मंजूर केला असून जामिनावर असताना साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा वा त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये, असेही न्यायालयाने त्याला बजावले आहे.

राणा याला ऑगस्ट २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. त्याच्यावर एका महिलेचा जीव धोक्यात असतानाही तिचा बेकायदा गर्भपात केल्याचा आणि त्यात त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. परिणामांची जाणीव असतानाही या महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर त्याला अटक करण्यात आली होती.