विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर आपण मोठे उद्योजक असून ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमात स्वत:चा स्टॉल लावण्याची थाप मारत महिलेला तब्बल १३ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या व्यक्तीविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपले जुहूमध्ये घर असून दुबईत बंगला असल्याचे या व्यक्तीने महिलेला सांगितले होते. विशेष म्हणजे फसवणूक झालेली महिला व्यवसायाने डॉक्टर आहे.
मालाड परिसरात राहणारी ३१ वर्षीय महिला डॉक्टरची विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून एका व्यक्तीची ओळख झाली. त्या व्यक्तीने उद्योजक असल्याचे सांगितले. दुबईमध्ये व्यवसाय असून मुंबईत जुहूमध्ये घर असल्याचे त्याने तरुणीला सांगितले. त्यानंतर केंद्र सरकारतर्फे वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात प्रदर्शन उभारायचे आहे, असे या तरुणाने महिलेला सांगितले. त्यासाठी १३ लाख रुपयांची तातडीची गरज असल्याचेही त्याने सांगितले. महिलेने या तरुणाला लगेचच मदत करत पैसे दिले. मात्र, त्यानंतर तरुणाने संपर्क साधणेच बंद केले.