News Flash

पालिका रुग्णालयात औषध दुकानाची मक्तेदारी

एकाच दुकानाचे नाव असलेल्या कागदावर औषधांची यादी

पालिकेच्या मरोळ प्रसूतिगृहातील रुग्णांना देण्यात येणारी औषधांची चिठ्ठी.

एकाच दुकानाचे नाव असलेल्या कागदावर औषधांची यादी

मुंबई : पालिका रुग्णालय, प्रसूतिगृह, दवाखान्यात विनाशुल्क औषधे मिळत असल्यामुळे मोठय़ा संख्येने रुग्ण तेथे उपचारासाठी जात असतात. पालिका रुग्णालये, प्रसूतिगृह, दवाखान्यांमधील औषधांचा साठा संपुष्टात आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरील औषधाच्या दुकानांमधून औषधे आणण्यास सांगण्यात येत असल्याचा प्रकार नवीन नाही. मात्र पालिकेच्या एका प्रसूतिगृहात चक्क औषधाच्या दुकानाचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक नमूद केलेल्या कागदावरच औषधे लिहून ती रुग्णांच्या नातेवाइकांना आणण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पालिकेच्या प्रसूतिगृहांमधील कारभार ऐरणीवर आला आहे.

पालिकेच्या केईएम, नायर आणि शीव या तीन मुख्य रुग्णालयांसह १६ संलग्न रुग्णालये, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांमध्ये दररोज मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांवर नाममात्र शुल्क घेऊन उपचार केले जातात. तसेच औषधही विनामूल्ये दिली जातात. मात्र काही वेळा रुग्णालयांमधील औषधांचा साठा संपुष्टात येतो. अशा वेळी डॉक्टर एका कोऱ्या कागदावर औषधांची यादी लिहून त्यावर रुग्णालयाचा शिक्का मारून बाहेरील औषधाच्या दुकानातून ती घेऊन येण्याची सूचना रुग्णांच्या नातेवाईकांना करतात. रुग्णालयातील औषधाचा साठा संपुष्टात आला असेल तर त्यात काहीच गैर नाही. मात्र अंधेरी येथील मरोळ नाक्यावरील पालिकेच्या मरोळ प्रसूतिगृहामधील डॉक्टर याच परिसरातील माफखान नगरमधील चक्क एका औषधाच्या दुकानदाराचे नाव, पत्ता असलेल्या कागदावरच रुग्णांना औषधे लिहून देत असल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे तर त्यावर औषधाच्या दुकानाचा क्रमांकही आहे. रुग्णांना औषध लिहून दिलेल्या या कागदावर ‘वैद्यकीय अधिकारी प्रभारी मरोळ मनपा प्रसूतिगृह’ असा शिक्काही मारण्यात आला आहे. तर काही रुग्णांना औषधे लिहून दिलेल्या या कागदावर डॉक्टरांची स्वाक्षरी अथवा शिक्काही नाही. असे असतानाही हा कागद घेऊन जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना औषधाच्या दुकानातून औषधे दिली जात आहेत.

कायद्यानुसार डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) औषधांच्या दुकानात औषधे देता येत नाहीत. काही औषधे अपवाद आहेत. मात्र मरोळ प्रसूतिगृहातील डॉक्टरांनी सर्रास औषधाच्या दुकानाचे नाव, पत्ता असलेल्या कागदावर स्वाक्षरी अथवा शिक्का मारलेला नसतानाही रुग्णांना औषधे उपलब्ध करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

प्रसूतिगृहात औषधांचा साठा उपलब्ध असतो. मात्र अपवादात्मक परिस्थितीत औषधे उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशा वेळी तातडीने गरज असल्यास रुग्णांना बाहेरील औषधांच्या दुकानातून औषधे आणण्यास सांगितले जाते, असे प्रसूतिगृहातील काही कर्मचारी – डॉक्टरांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

मात्र औषधाच्या दुकानाचे नाव असलेल्या कागदावर रुग्णांच्या नातेवाइकांना औषधे लिहून देण्यात येत असल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. तर काही डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी त्याबाबत खासगीमध्ये कबुलीही दिली.

पालिकेकडून वेळीच आवश्यक असलेली साधनसामग्री मिळत नाही. त्यामुळे पाठकोऱ्या कागदावर औषधे लिहून देण्याची वेळ ओढवते. कदाचित औषधाच्या दुकानदाराने दिलेल्या  कागदांचा वापर त्यासाठी करण्यात आला असावा.

मात्र औषधाच्या दोन दुकानदारांमधील वादातून याबाबत तक्रार करण्यात आल्याचेही काहींनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, या संदर्भात प्रसूतिगृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 3:35 am

Web Title: doctor in bmc hospital use writing pad with medical name for prescribed drugs
Next Stories
1 सहा नगरसेवकांना समाजकल्याण केंद्रांची लॉटरी
2 मध्य रेल्वेवर गर्दी व्यवस्थापनाचे प्रयोग
3 खारफुटीत मद्याच्या बाटल्यांचा खच
Just Now!
X