तबस्सुम बरनागरवाला –

26/11 Stories of Strength: करोनाचा फैलाव सुरु झाल्यापासून एकीकडे त्यांच्या वयाचे लोक घरातच थांबणं पसंत करत असताना दुसरीकडे श्वसनरोगतज्ज्ञ डॉक्टर जलील पारकर रुग्णसेवा करण्यात व्यस्त होते. मार्च महिन्यापासून ६२ वर्षीय डॉक्टर जलील पारकर लिलावती रुग्णालयातील कोव्हिड आयसीयूमध्ये सेवा देत आहेत. यादरम्यान डॉक्टर जलील पारकर आणि त्यांच्या पत्नीना करोनाची लागणही झाली होती.

२०१६ पासून प्रत्येक वर्षी इंडियन एक्स्प्रेस २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतींना बातम्यांच्या तसंच कार्यक्रमाच्या माध्यमातून उजाळा देत असतं. हल्ल्यात मोलाची कामगिरी निभावणाऱ्या जवानांचं, सर्वसामान्यांचं शौर्य तसंच त्याचून बचावलेल्यांची जीवनगाथा मांडण्याचा प्रयत्न असतं. पण यावेळी मुंबई शहर एका वेगळ्याच संकटाला तोंड देत आहे. चेहऱ्यावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत करोना योद्धे या महामारीचा सामना करत आहेत जेणेकरुन आपण सर्वजण सुरक्षित राहावेत.

करोना संकटाच्या या काळात डॉक्टर जलील पारकर यांनीही मोलाचं कार्य केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने त्यांचं हे काम सीरिजच्या माध्यमातून समोर आणलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी या विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे. २९ नोव्हेंबरला हा कार्यक्रम स्टार प्लस तसंच डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.

सेलिब्रिटी डॉक्टर असणारे जलील पारकर यांनी अनेक बॉलिवूड अभिनेते, राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर उपचार केले आहेत. “पण जेव्हा करोना संकट आलं तेव्हा त्यात किती धोके आहेत हे माहिती असतानाही काय करायचं हे आपल्या डोक्यात नक्की होतं,” असं जलील पारकर सांगतात. जलील पारकर आणि त्यांच्या ५६ वर्षीय पत्नी दोघांनाही डायबेटिसचा त्रास आहे. त्यांचे ९५ वर्षीय वडीलही सोबतच राहतात.

जलील पारकर यांनी सर्व काळजी घेत काम करण्यास सुरुवात केली होती. रुग्णांवर उपचार करणं, त्यांचं समुदेशन करणं, त्यांच्या कुटुंबासोबत व्हिडीओ कॉल्स अशा अनेक गोष्टी जलील पारकर करत होते. यादरम्यान आपल्या हाय-प्रोफाइल रुग्णांना बाजूला ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अनेकदा काम संपल्यानंतर जेव्हा जलील पारकर आपला फोन हातात घ्यायचे तेव्हा ६० ते ७० मिस कॉल असायचे. जलील पारकर यांनी उपचार केलेल्यांमध्ये अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांचाही समावेश होते. दुर्दैवाने करोनाविरोधातील त्यांचा लढा अपयशी ठरला.

जून महिन्यात जलील पारकर आणि त्यांच्या पत्नीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जवळपास आठवडाभर दोघांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. जलील पारकर यांना पाठीचा त्रास सुरु झाला आणि त्यानंतर वास आणि चव कमी झाली. त्यांना श्वसनाचाही त्रास होऊ लागला होता. नंतर त्यांच्या पत्नीलाही लिलावतीत दाखल करण्यात आलं.

आयुष्यात सर्व काही पाहिलेल्या जलील पारकर यांना जेव्हा त्यांचे सहकारी फोन करायचे तेव्हा मात्र त्यांची चिंता वाढायची. सेलिब्रिटी स्टेटस आणि इतके संपर्क असतानाही जेव्हा जलील पारकर यांना जेव्हा रेमडेसिविरची गरज होती तेव्हा कोणीही मदतीला नव्हतं. अखेर एक ५३ वर्षीय स्टॉक ब्रोकर त्यांच्या मदतीला धावून आला. पारकर यांनी त्यांच्या वडिलांवर करोना उपचार केले होते. “माझ्या वडिलांचं निधन झालं. रेमडेसिविर औषधाची गरज असतानाही मला खूप समस्या आल्या होत्या. यामुळेच मी रेमडेसिविरची इंजेक्शन्स खरेदी केली आणि गरज असणाऱ्या रुग्णांना पुरवली,” असं त्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

जलील परकर यांना रेमडेसिविरचे दोन डोस देण्यात आले आणि त्यांना अक्षरश: आपण मृत्यूला पाहून परत आल्याचा अनुभव झाला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जलील पारकर आणि त्यांची पत्नी विलगीकरणात होते. जलील पारकर यांचा मुलगा ट्रायडेंट हॉटेलमध्ये कामाला असून लॉकडाउनच्या निर्बंधामुळे त्याला तिथेच राहावं लागलं होतं. रुग्णालयात असताना जलील पारकर यांनी घरी असणाऱ्या ९५ वर्षीय वडिलांची चिंता सतावत होती. पण त्यावेळी तिथे मदत उपलब्ध होती, अन्यथा त्यांना एकट्याने सर्व करणं फार कठीण झालं असतं असं जलील पारकर सांगतात.

जलील पारकर पुन्हा रुग्णालयात येणार नाहीत असं त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत असतानाच जुलै महिन्यात पारकर पुन्हा कामावर रुजू झाले. यावेळी त्यांनी फक्त एक सूट घेतली होती. ती म्हणजे सकाळच्या वेळी जेव्हा गर्दी नसते तेव्हा काम करण्याची. रोज सकाळी ९.३० वाजल्यापासून तीन तास ते रोज आयसीयूमध्ये असायचे. आणि त्यानंतर ओपीडीमधील रुग्णांची काळजी घेत होते. सप्टेंबर महिन्यात जेव्हा करोनाबाधित रुग्णसंख्या वाढत होती तेव्हा जलील पारकर दिवसाला जवळपास ८० करोना रुग्णांची तपासणी करायचे. “देवाने आपल्याला संधी दिली आहे तर आपण हे का करु नये असा विचार मी केला,” असल्याचं जलील पारकर म्हणतात.

सहाव्या माळ्यावर असणाऱ्या आयसीयूमध्ये करोनामुळे असणारी खिन्नता जलील पारकर यांना फार टोचते. तिथे ओळखीचे असणारे अनेक चेहरे आता मास्कमुळे दिसत नाहीत. “जर रुग्णाला गरज असेल तर आपण त्याचा हात हातात घेताना संकोच करत नाही,” असं जलील पारकर म्हणतात. मात्र हे सर्व करताना ते कधीही मास्क काढत नाहीत. “मास्क न घालणे यामध्ये कोणताही मोठेपणा नाही,” असं ते म्हणतात.

जलील पारकर यांनी आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या एक हजार आणि ओपीडीमधील ५०० करोना रुग्णांवर उपचार केले आहेत. आणि अजूनही ते सहज झालेलं नाही. “प्रकृती खराब झालेल्या अनेक वयस्कर रुग्णांना पाहिल्यानंतर मी असहाय्य होतो. अद्यापही करोनावर ठोस उपचार नाही आणि अनेकदा त्यांना वाचवण्यासाठी आम्ही काहीच करु शकत नाही,” अशी हतबलता ते व्यक्त करतात.