डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी चौकशी करत असलेल्या राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा अहवाल पुढील आठवडय़ात येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा योग्यरीतीने तपास होत आहे का याचा आढावा आयोग घेत आहे.

आयोग तीन दृष्टिकोनातून या घटनेची चौकशी करत आहे. यामध्ये पायल यांचा झालेला छळ हा रॅगिंगचा भाग आहे का? वैद्यकीय प्रवेश घेतल्यापासून गेल्या आठ वर्षांत पायल यांना रॅिगगबाबत काही माहिती होती का, एमबीबीएसपासून पायल या अशा प्रकारच्या छळाला सामोऱ्या जात होत्या का आणि यामधून पायल यांची मानसिक स्थिती नेमकी काय होती हे समजून घेत आहोत. नायर रुग्णालयातील रॅिगग समितीचा कार्यकाल, सभासद, रॅगिंगविषयी जनजागृतीसाठी केलेले उपक्रम आणि गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या समितीच्या बैठका याचा आढावा घेतला गेला. नायरच्या स्त्रीरोग विभागामध्ये राखीव कोटय़ातून पायल यांच्यासोबत अन्य किती विद्यार्थी शिकत होते. त्यांचे अनुभव काय आहेत, याची माहिती घेत आहोत. या सोबतच पोलिसांच्या तपासाबाबत जाणून घेत असल्याचे राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायाधीश थूल यांनी सांगितले.

आयोगाचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील आठवडय़ात तो राज्य सरकारला दिला जाईल. या अहवालात अशाप्रकारच्या रॅगिंगच्या घटना भविष्यात घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय सुचविण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले.

या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर यांना लगेचच न्यायालयीन कोठडी देऊन न्यायालयाने याची चौकशी करण्याची संधीच दिलेली नाही. पोलिसांकडून हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे गेल्यानंतर आरोपींच्या चौकशीसाठी पुरेसा अवधी देणे गरजेचे होते, असे मत थूल यांनी व्यक्त केले.