14 August 2020

News Flash

मुंबईत करोना चाचणीसाठी लागणार नाही डॉक्टरांचं ‘प्रिस्क्रिप्शन’! नवी नियमावली जाहीर

मुंबईत करोना चाचणींसंबंधी महत्त्वाचा निर्णय

संग्रहित छायाचित्र (एक्स्प्रेस फोटो - प्रवीण खन्ना )

खासगी प्रयोगशाळांमध्ये करोना चाचणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक नसल्याचे मुंबई पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या व्यक्तीला आता थेट चाचण्या करणे शक्य होणार आहे. आत्तापर्यत खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी डॉक्टरची चिठ्ठी बंधनकारक होती. त्यामुळे अनेक वादही निर्माण झाले होते. पालिकेच्या नव्या नियमानुसार, करोनाची लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेत विनाचिठ्ठी चाचण्या करता येतील. तसेच प्रयोगशाळेपर्यत पोहोचू न शकणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर आजारांच्या व्यक्तींच्या चाचण्या घरी जाऊन करण्याची मुभाही पालिकेने खासगी प्रयोगशाळांना दिली आहे.

करोनाच्या निदानासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या आणि पुरेसे संचही उपलब्ध असल्याने अधिकाधिक चाचण्या केल्या जाव्यात. खासगी प्रयोगशाळांवरील नियमही शिथिल करत चाचण्या खुल्या कराव्यात असे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत. यानुसार, चाचण्या करण्याबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासंबंधीची बैठक सोमवारी झाली असून लवकरच सुधारित नियमावली जाहीर केली जाणार आहे.

मोफत चाचण्या करण्यासाठी मात्र रुग्णांना पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणी करावी लागेल. त्यानंतरच चाचण्या केल्या जातील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विलगीकरणातून घरी जाण्यापूर्वी चाचण्या
विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही घरी जाण्यापूर्वी चाचण्या केल्या जाणार आहेत. जेणेकरून या व्यक्तींना लक्षणे नसली तरी संसर्गाचे निदान केले जाईल. यामुळे ते घरी परत गेल्यावर संसर्ग प्रसाराचा धोका नसेल. तसेच ज्येष्ठ व्यक्ती आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर आजार असणाऱ्या व्यक्तींच्याही चाचण्या केल्या जातील. यासाठी प्रतिजन चाचण्या उपलब्ध केल्या आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:48 pm

Web Title: doctor prescription not required to get corona test in mumbai bmc revises testing guidelines sgy 87
Next Stories
1 शाळा सुरु करताना सावधान! कोविड कावासाकीचा विचार करा- डॉ. सुभाष साळुंखे
2 मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांमध्ये पावसाची दमदार हजेरी
3 दादर परिसरात झपाटय़ाने रुग्णवाढ
Just Now!
X