तीन महिला डॉक्टरांविरोधात गुन्हा

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी (वय २३) या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला.

डॉ. पायल यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून म्हणजे वर्षभरापासून या तिघींनी त्यांचा छळ सुरू केला होता. या तिघींकडून होणारा जाच पायलने अनेकदा पालकांना, पतीला सांगितला होता. त्याविरोधात रुग्णालयाचे अधिष्ठाते, वसतिगृहाच्या वॉर्डन आणि व्याख्यात्यांकडे लेखी तसेच तोंडी तक्रारीही केल्या होत्या, मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सावलाराम आगावणे यांनी दिली.

सीईटी, नीट परीक्षा दिल्यानंतर पायलला टोपीवाला महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिचे पती कूपर रुग्णालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. अभ्यास करता यावा यासाठी पतीने भायखळा येथे भाडय़ाने घेतलेल्या खोलीत राहाण्याऐवजी पायलने रुग्णालयाच्या आवारातील वसतिगृहात राहाणे पसंत केले. मात्र तेथे पहिल्या दिवसापासून डॉ. आहुजा, डॉ. मेहेर आणि डॉ. खंडेलवाल यांनी जातीवरून पायलला त्रास देण्यास सुरुवात केली. एकांतात, रुग्णांसमोर तिचा सातत्याने पाणउतारा सुरू ठेवला. व्हॉट्सअ‍ॅप समूहात पायलला उद्देशून टोमणे मारू लागल्या. शिक्षण पूर्ण होऊ देणार नाही, अशा धमक्या देऊ लागल्या, अशी माहिती तिच्या आईने पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणी गेल्या आठवडय़ात आई आणि नातेवाईकांनी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील शिपायाने भेट नाकारली आणि तक्रार अर्ज टपालाद्वारे सादर करावा, अशी सूचना केली. त्यासोबत तडवी कुटुंबाने या प्रकाराबाबत वसाहतीच्या वॉर्डन मनीषा रत्नपारखी, व्याख्यात्या डॉ. चिंग ली यांची भेट घेतली.