मद्यपान करुन गाडी चालवण्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी हटकल्यावर त्यांच्याशीच हुज्जत घालणाऱ्या ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सोमवारी जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जे जे रुग्णालयात चौकशी समिती नेमण्यात आली असून समितीच्या निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल.

रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास डॉ. शिव महेंद्रा, डॉ. वेद रवीश आणि डॉ.राहुल जैन यांना वाहतूक पोलिसांनी हाजी अली जंक्शनजवळ हटकले. वेद रवीश गाडी चालवत होता व तिघांनी मद्यपान केले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. वेद रवीश याला गाडीबाहेर पडण्यास सांगितल्यावर या तिघांनीही पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. या तिघांनाही त्यानंतर नायगाव पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या तिघांचीही मंगळवारी दुपारी जामिनावर मुक्तता करण्यात आली.

ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या या तीनही विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्तणुकीचे पडसाद सामाजिक माध्यमांमध्येही उमटले. या तीनही विद्यार्थ्यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून चौकशीनंतर समितीने दिलेल्या निर्णयानुसार कारवाई केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.