कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर सविता उपाडे आणि परिचारिका मीनाक्षी सोनार यांच्याविरोधात कळवा पोलिसांनी अर्भक मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यामुळे रुग्णालयातील सुमारे ५० निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांनी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.   या आंदोलनामुळे रुग्णालयातील आरोग्य सुविधांवर कोणताच परिणाम होणार नसल्याचा दावा करत त्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक आर.आर. कोरडे यांनी स्पष्ट केले.  
पैसे नसल्यामुळे शारदा घोडे या महिलेला रुग्णालयाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. यामुळे रस्त्यावर प्रसूती होऊन तिचे नवजात बाळ दगावले. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने डॉक्टर उपाडे व सोनार यांच्यावर कारवाई केल्याने निवासी व शिकाऊ डॉक्टरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.