टाळेबंदीच्या काळात डॉक्टरांच्या संघटनांनी स्वत:हून पुढे येऊन पालिकेला सहकार्य करावे, अशी सूचना न्यायालयाने केली. तर करोनाव्यतिरिक्त अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांची हेळसांड होऊ नये, त्यांना वेळीच उपचार मिळावे यादृष्टीने गेल्याच आठवडय़ात नियमावली जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली. सध्या सगळे लक्ष करोनाबाधितांवर केंद्रीत केले गेल्याने अन्य आजारांच्या रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही, त्यांना वेळीच उपचार मिळत नसल्याने बहुतांश प्रकरणात या रुग्णांना जीव गमवावा लागत आहे, असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावर उत्तर दाखल करताना या रुग्णांची हेळसांड होऊ नये, त्यांना वेळीच उपचार मिळतील यादृष्टीने नियमावली जाहीर करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली.