मुंबई पोलिस दलामध्ये कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळावी यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज केले असून यामध्ये चक्क डॉक्टर, इंजिनीअर व एमबीए सारख्या उच्चशिक्षितांचाही समावेश आहे. कॉन्स्टेबलपदासाठीच्या अवघ्या 1400 जागांसाठी तब्बल दोन लाख अर्ज आल्यामुळे राज्यात रोजगाराची अवस्था किती बिकट आहे हेच अधोरेखीत होत आहे.

कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी आहे. तर, या पदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये तब्बल 40 हजारांपेक्षा जास्त पदवीधारक आहेत आणि तीन हजारांपेक्षा जास्त पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. तसेच, तीन डॉक्टर, पाच वकिल, 167 एमबीए व 423 इंजिनीअर्सही हातात काठी घेऊन मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल होण्यासाठी उत्सुक आहेत.

पालघरमध्येही डॉक्टर, अभियंत्यांचे पोलीस शिपाईपदासाठी अर्ज

सध्या महाराष्ट्रातच पोलिस दलामध्ये भरती सुरू असून सर्वाधिक पदांची भरती मुंबई पोलिस दलात आहे. मुंबईतील नायगाव येथील हुतात्मा मैदानात उमेदवारांच्या शारिरीक क्षमतेच्या परीक्षा होत असून हे उमेदवार तिथं आपलं नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे महिला कॉन्स्टेबल पदाच्या 460 जागा असून तब्बल 32 हजार 280 मुली आपलं कसब पणाला लावत आहेत.

रोज सुमारे 9000 जणांची चाचणी घेण्यात येत असून आठ मे पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. राज्यामध्ये किंवा एकूणच देशामध्ये रोजगाराचा प्रश्न किती तीव्र आहे हे दर्शवणारी ही आकडेवारी आहे. पोलिस कॉन्स्टेबलला साधारणपणे महिन्याला 25 हजार रुपये पगार व भत्ते मिळतात. सरकारी नोकरीमध्ये असलेली शाश्वती आणि महिन्याचा 25 हजारांचा पगार यासाठी सव्वादोन लाख तरूण आपलं नशीब या मायानगरीत आजमावत आहेत.