News Flash

डॉक्टरांसाठी करोना पोषाख बनलीय एक ‘भट्टी’!

डॉ. दीपक मुंढे यांनी पत्रातून मांडली व्यथा

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य 
मुंबई: लघवीला जायचंय पण जाता येत नाही. भूक लागलीय पण खाता येत नाही. खाणं तर सोडाच साधं पाणीही पिता येत नाही… हे सारं एकवेळ ठीक आहे पण करोना संरक्षित पोषाख एकदा का अंगावर चढवला की एखाद्या भट्टीत असल्याप्रमाणे आम्ही अक्षरश: शिजत असतो. आत घामाच्या धारा वाहात असतात आणि समोर रुग्णावर उपचार सुरू असतो… ही भावना व्यक्त केली आहे, केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर दीपक मुंढे यांनी.

मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव तसेच सेव्हन हिल व कस्तुरबा रुग्णालयात करोनाशी थेट लढणाऱ्या प्रत्येक डॉक्टरची परिस्थिती काहीशी अशीच आहे. एकीकडे काही ठिकाणी करोना संरक्षित पोषाख मिळत नाहीत यासाठी डॉक्टर व परिचारिकांची लढाई सुरू आहे तर दुसरीकडे भट्टीत शिरल्याचा आभास निर्माण करणारा करोना संरक्षित पोषाख घालून शेकडो रुग्ण तपासण्याचे आव्हान पालिकेचे बहुतेक डॉक्टर पेलत आहेत.

“करोनाचे रुग्ण ज्या विभागात अथवा अतिदक्षता विभागात असतात तेथे वातानुकूलित यंत्रणा ( एसी) बंद ठेवावी लागते. अन्यथा एसीमुळे साथ बाहेर पसरू शकते. विचार करा अशा अवस्थेत रात्री आम्ही सारे डॉक्टर बारा बारा तास आम्ही कसे काम करत असू?” असा सवाल डॉ दीपक मुंढे यांनी एका खुल्या पत्राद्वारे केला आहे. ‘लोकसत्ता’ शी बोलताना डॉ मुंढे म्हणाले, “गेला महिनाभर मी करोना रुग्णांच्या विभागात कधी दिवसा आठ तास तर रात्री बारा तास काम करत आहे. आज महिनाभरानंतर मला सुट्टी मिळाली आहे. एका भयंकर शारीरिक व मानसिक विवंचनेतून आम्ही सारे डॉक्टर जात आहोत. तरीही या आणीबाणीच्या काळात अहोरात्र सेवा बजावत आहोत. माध्यमातून येणाऱ्या काही अतिरंजित बातम्यांमुळे एकीकडे आमच्या घरचे लोक हवालदिल आहेत तर दुसरीकडे पीपीई किट घातल्यानंरच्या यातना न सांगता येणाऱ्या आहेत.”

“आज आम्ही बहुतेक डॉक्टर २४ ते ३० वयोगटातील आहोत पण आमच्यातील वयस्कर तसेच मधुमेह आदी आजार असणाऱ्या परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाची कल्पनाही करवत नाही, असे डॉ मुंढे म्हणाले. करोना संरक्षित पोषाख घालणे व काढणे हेही खूप काळजीपूर्वक करावे लागते. चेहऱ्याला एन – ९५ चा मास्क, त्यावर तीन थराचा सर्जिकल मास्क आणि त्यावर चेहरा झाकणारे प्लास्टिकचे कव्हर यामुळे श्वासही नीट घेता येत नाही. प्रचंड गुदमरल्यासारखे होते. श्वास सोडण्याच्या प्रक्रियेत गॉगलवर धुके जमा होते त्यामुळे समोर अंधुक दिसते. याही परिस्थितीत सतत अलर्ट राहून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संभाव्य धोका समजावून पटापट उपचार करावे लागतात.”

“अनेकदा ओरडून बोललं तरच रुग्णांपर्यंत आमचा आवाज पोहोचतो. ओरडून बोलावे लागत असल्याने घसा पार कोरडा पडतो पण साधारण पाणीही पिता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी आमची परिस्थिती मात्र न थकता रुग्ण सेवा म्हणून आम्ही जीवन मरणाची लढाई लढत आहोत” असे डॉ मुंढे यांनी सांगितले. निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेचे हंगामी अध्यक्ष असलेले डॉ. मुंढे हे बुलडाणा जिल्ह्यातील लोणारच्या चिखली गावातील असून या गावातील एमबीबीएस झालेले ते पहिलेच डॉक्टर आहेत. डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या लोकांनी तसेच किरकोळ मागण्यांसाठी आम्हाला संप करायला लावणाऱ्या प्रशासनातील उच्चपदस्थांनी आमच्या आजच्या कामाचे मोल जाणावे ही आम्हा निवासी डॉक्टरांची भावना आहे. आज जरी मी सुट्टीवर असलो तरी लवकरच पुन्हा कामावर रुजू होऊन नव्या दमाने ही लढाई लढेन” असेही डॉ मुंढे यांनी सांगितले.

केईएमचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख यांनीही “निवासी डॉक्टर, परिचारिका तसेच करोनाच्या लढाईतील प्रत्येक आरोग्य सैनिक हा कौतुकास पात्र असल्याचे सांगितले. करोना किट घालून आठ आठ तास काम करणे हे एक आव्हान आहे. करोनाची साथ पसरू नये यासाठी एसीचा वापर करता येत नाही आणि अनेक थरांचा हा पोषाख घालून अंगातून घामाच्या धारा वाहात असताना आमचे डॉक्टर करोना रुग्णांना बरे करण्यासाठी झटत असतात. ही लढाई रुग्ण सेवेसाठी आहे आणि पालिकेचे डॉक्टर व परिचारिका जीवाची बाजी लावून ती लढत आहेत” असे डॉ देशमुख म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 4:43 pm

Web Title: doctors facing problems after wearing ppe kit to fight corona says dr deepak mundhe in his letter scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाच्या चक्रात शेकडो सामान्य रुग्णांची फरफट!
2 मुंबई: दोन महिन्याच्या चिमुकलीने करोनाला हरवलं; आई आणि तीन वर्षाची बहिणही झाले करोनामुक्त
3 अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर अज्ञातांचा हल्ला
Just Now!
X