22 September 2020

News Flash

वांद्रे पश्चिममध्ये जनजागृतीसाठी डॉक्टरांची मदत

रुग्णांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्याचे महापालिकेचे आवाहन

(संग्रहित छायाचित्र)

रुग्णांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्याचे महापालिकेचे आवाहन

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या वांद्रे पश्चिम विभाग कार्यालयाने खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचे ठरवले आहे. आपल्याकडे आलेल्या रुग्णांना थोडा अधिक वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना मार्गदर्शन करा, करोनापासून वाचण्यासाठी दैनंदिन आयुष्यात काय काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सूचना द्या, असे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी या डॉक्टरांना केले आहे.

करोनासोबत जगताना प्रत्येकालाच खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे, पण ही खबरदारी नक्की कशी घ्यावी याबाबत सर्वाच्याच मनात शंका असतात. या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जण समाजमाध्यमांचा वापर करत असतो. परंतु, डॉक्टरांनी आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाला ही माहिती दिली तर अधिक चांगल्या प्रकारे जनजागृती होईल या उद्दशाने वांद्रे पश्चिम विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी खासगी डॉक्टरांना आवाहन केले आहे. खार, वांद्रे, सांताक्रुझ खासगी डॉक्टरांच्या संघटनेबरोबर विसपुते यांनी नुकतीच एक बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी हे आवाहन केले.

उच्चभ्रू वर्ग असलेल्या वांद्रे पश्चिम भागात पहिला रुग्ण १५ मार्चला आढळला होता. त्यानंतर ३१ मे रोजी हीच संख्या ८०० झाली होती. त्यापैकी झोपडपट्टीतील ६०० तर इमारतीतील २०० रुग्ण होते. मात्र टाळेबंदीनंतर ही संख्या आता २,६५१ झाली आहे. या भागात दररोज सरासरी ३२ रुग्णांची नोंद होते. त्यापैकी २९ रुग्ण इमारतीतील असतात. शास्त्रीनगर, नर्गिस नगर, खारदांडा, गझदरबंध येथील वस्त्यांमधील संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आले आहे. मात्र इमारतीतील सुशिक्षित वर्गाला समजावण्यासाठी डॉक्टरांची मदत घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  एखादा रुग्ण करोनाव्यतिरिक्त आजारांसाठी डॉक्टरकडे येतो, मग त्याला आवश्यकता असेल तर पुढील उपचारासाठी दुसरीकडे पाठवावे लागते. अशा वेळी त्या रुग्णाने काय काळजी तिथे घेतली पाहिजे, हे डॉक्टरांनी सांगणे अपेक्षित आहे. एखादी गरोदर महिला असेल तर विविध तपासण्यांच्यावेळी करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तिने काय काळजी घेतली पाहिजे, नोकरदार मंडळींनी आपल्या मुलांच्याबाबत, घरातील वृद्ध मंडळींच्या बाबत काय काळजी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन डॉक्टरांनी करावे, असे आवाहन केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सर्वसामान्य माणसाचा आपल्या कौटुंबिक डॉक्टरांवर जास्त विश्वास असतो. डॉक्टरही त्यांना ओळखत असतात. त्यामुळे डॉक्टरांना आवाहन केले आहे. आतापर्यंत ६०-७० डॉक्टरांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.

– विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त, वांद्रे पश्चिम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 4:08 am

Web Title: doctors help for awareness about corona in bandra west zws 70
Next Stories
1 चाहत्यांचा आकडा फुगवून घेणाऱ्यांवर नजर
2 पालिकेच्या १०८ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू
3 बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव यंदा डिजिटल स्वरूपात
Just Now!
X