केईएम रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणय जयस्वाल (२७) यांनी शनिवारी आत्महत्या केली. ते गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते. वैयक्तिक कारणांमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मूळ अमरावती येथील असलेल्या प्रणय यांनी केईएमधील शस्त्रक्रिया विभागामध्ये नुकतेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. याच विभागात ते वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. ते रुग्णालय परिसरातील वसतिगृहात रहायचे. शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत ते वसतिगृहात परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मित्रांसह रुग्णालय प्रशासनाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सकाळी ११ च्या सुमारास वसतिगृहाच्या गच्चीवर त्यांचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

इंजेक्शनमधून विष घेतले

प्रणय यांनी इंजेक्शनमधून विष घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासामध्ये आढळले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. ते गेल्या सहा महिन्यांपासून  मानसिक तणावाखाली होते. त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. शवविच्छेदन अहवालामधून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे  पोलिसांनी सांगितले.

वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक

प्रणय यांना वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक मिळाले होते. दोन महिन्यांपूर्वी केईएम रुग्णालयात झालेल्या दीक्षांत समारंभासाठी त्यांचे आई, वडील, बहीण आणि सर्व कुटुंबीय मुंबईला आले होते. प्रणय यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नव्हते. त्यांच्या मृत्यूने आम्हाला धक्काच बसला आहे, असे प्रणयचे मामेभाऊ  मोहन जयस्वाल यांनी सांगितले. प्रणय यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील खाते बंद केल्याचे समजते.