मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतल्यानंतर अखेर मार्ड संघटना मवाळ झाली आहे. उद्या सकाळी ८ वाजता मार्डचे डॉक्टर कामावर रुजू होतील, असे मार्डने मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. ‘दुपारी तीन वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ असा आक्रमक पवित्रा मुंबई उच्च न्यायालयाने आज घेतला. त्यामुळे मार्डने मवाळ भूमिका घेत प्रतिज्ञापत्र सादर घेत उद्या सकाळी ८ वाजता मार्डचे डॉक्टर कामावर परततील, अशी हमी मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात ‘मार्ड’ने संप मागे घेत असल्याचे सांगितले होते. मात्र तरीही मार्डच्या डॉक्टरांचा संप शुक्रवारी सुरुच राहिला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मार्डला धारेवर धरले. प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा थेट इशारा मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला. यानंतर मार्डने दुपारी मुंबई उच्च न्यायालयाला डॉक्टर उद्या डॉक्टर कामावर रूजू होतील, अशी हमी दिली. यासोबतच राज्य सरकारकडून डॉक्टरांवर कारवाई झाल्यास आक्षेप घेतला जाणार नाही, असेही मार्डने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले.

मार्डने गुरुवारीदेखील न्यायालयाला संप मागे घेत असल्याचे सांगितले होते. मात्र तरीही मार्डचा संप शुक्रवारीदेखील सुरु होता. त्यामुळे उद्या सकाळी कामावर रुजू न झाल्यास सरकार आणि पालिकेकडून संप करणाऱ्या डॉक्टरांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मार्डच्या संपामुळे मुंबईत गेल्या ३ दिवसांमध्ये १३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे.