स्वा.सावरकरांच्या जीवनातील घडामोडी व कार्याविषयी नोंदी असलेले महत्वाचे गोपनीय दस्तावेज पाहण्यासाठी आणि प्रती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना देऊनही पोलिसांच्या अडवणुकीमुळे ते सावरकर प्रेमी श्रीधर दामले यांना उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही पोलिस अधिकारी जुमानत नसल्याची कैफियत दामले यांनी पत्रकारांपुढे मांडली.
एका बँकेतून सेवानिवृत्त होऊन शिकागो येथे वास्तव्यास असलेले दामले हे सावरकरांच्या जीवनातील घडामोडींवर संशोधन करीत आहेत. फ्रान्स, ब्रिटन व अन्य देशांमधून त्यांनी काही कागदपत्रे मिळविली आहेत. महाराष्ट्र सरकारच्या गोपनीय अभिलेख विभागाच्या ताब्यात असलेली कागदपत्रे मिळविण्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी प्रयत्न केले होते. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या सूचनेमुळे काही दस्तावेज पाहता आले. पण सुमारे १२ हजार पानांच्या प्रती देण्याची परवानगी मिळाली नव्हती. आता त्यांना ही गोपनीय कागदपत्रे हवी असून पोलिसांनी दाद न दिल्याने त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनंतर महासंचालक कार्यालयात मुलाखत घेण्यात आली. त्यांचा उद्देश व अन्य माहिती विचारण्यात आली. पण तरीही कागदपत्रे पाहण्याचीही परवानगी मिळालेली नाही, असे दामले यांनी सांगितले.
सावकरांविषयीची १९४३ पर्यंतची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. पण फाळणी व अन्य विषयांबाबतची काही कागदपत्रे आपल्याला पहायची आहेत, कोणताही वाद निर्माण करण्याचा आपला हेतू नाही. केवळ संशोधनासाठी ती हवी असल्याचे दामले यांनी सांगूनही पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.