जम्मू-काश्मीरमध्ये गुपकर आघाडी ही राष्ट्रविरोधी आघाडी कार्यरत असून या आघाडीचा आम्ही निषेध करतो. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे या आघाडीमध्ये काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे गुपकर आघाडीच्या अजेंड्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे? असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, “जम्मू-काश्मीर भारतविरोधी शक्ती आहेत, अशा शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांशी हातमिळवणी करुन त्या माध्यमातून पुन्हा कलम ३७० लागू झाली पाहिजे, असा प्रयत्न करत आहेत. गुपकर नावानं तिथं अनेक पक्षांचं एकत्रिकरण झालं आहे. सर्वात अश्चर्याची बाब म्हणजे या गुपकर आघाडीमध्ये काँग्रेसही समाविष्ट आहे. आमचा काँग्रेसला सवाल आहे की त्यांचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?”

चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करु असं विधान फारुख अब्दुल्ला यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यानं केलं आहे. यापेक्षा आश्चर्यकारक आणि संतापजनक दुसर काहीच असू शकत नाही. दुसरीकडे मेहबुबा मुफ्ती म्हणतात काश्मिरचा झेंडा बहाल झाला नाहीतर आम्ही राष्ट्रीय झेंडा लावू देणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये आमच्यासोबत सत्तेत असताना तिरंग्याचा अपमान करण्याची पीडीपीची हिंमत होत नव्हती. मात्र, आता तिरंग्याचा ते अपमान करत असताना काँग्रेस त्यांच्यासोबत गेली आहे, अशा लोकांसोबत काँग्रेस जात असेल तर त्यांचा चेहरा उघडा पाडायला हवा, अशा शब्दांत फडणवीस यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं.

काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही फुटीरतावाद्यांसोबत घेऊ अशी भाषा गुपकर आघाडीद्वारे केली जात आहे. अशी मागणी करणाऱ्यांसोबत जर काँग्रेस उभी असेल तर आम्ही याबाबत काँग्रेसला रोज प्रश्न विचारु आणि देशासमोर सर्व देशभक्त आणि राष्ट्रीय शक्ती मिळून उघडं पाडू, या कृतीचा आम्ही उघडपणे निषेध करतो. आता काहीही झालं तरी देशात पुन्हा ३७० कलम लागू देणार नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.