राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवरून राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी शिवजयंती व धार्मिकस्थळांचा मुद्दा उपस्थित करत, महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरेल.

फडणवीस म्हणाले, या सरकारला असं वाटतं की करोना कुठं वाढतो तर फक्त मंदिरांमध्ये वाढतो. शिवजयंती आणि मंदिरं यातूनच करोना वाढतो? काहीतरी आकडेवारी द्यावी की कुठलं मंदिर उघडल्याने करोना वाढला. केवळ मंदिरच नाही तर मी सर्व धार्मिक स्थळांचा विचार करतोय. देशभरातील धार्मिकस्थळं उघडली कुठही करोना वाढला नाही आणि महाराष्ट्रात करोना वाढला तर तो धार्मिकस्थळ उघडायला लावल्यामुळे वाढला? मला आश्चर्य वाटतं पब चालू शकतात, दारूची दुकानं चालू शकतात, हॉटेल चालू शकतात, सिनेमागृहे चालू शकतात, राजकीय मेळावे देखील चालू शकता यामुळे करोना होत नाही? पण मंदिर व शिवजयंतीमधून करोना होतो? हे जे काय सुरू आहे ते चुकीचं आहे. वारकरी परंपरा ही खूप मोठी परंपरा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे महाराष्ट्राची जशी संपूर्ण विश्वात ओळख आहे, तशीच वारकरी संप्रदायामुळे देखील आहे. पण त्याही संदर्भात या ठिकाणी वारंवार विषय उपस्थित करावा लागतो, हे खरोखर अत्यंत दुर्देवी आहे.

आणखी वाचा- “जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा, ३०९०० जणांचे प्राण वाचवता आले असते जर…”; फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

आणखी वाचा- फडणवीस म्हणतात, “हे सरकार मला नारायण भंडारीसारखं वाटतंय!”

राज्यातील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या शिवजयंतीवर निर्बंध आणली होती. त्यामुळे भाजपाने या मुद्यावरून महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं होतं. तसेच, या अगोदर राज्यभरातील धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी देखील भाजपाने आक्रमक भूमिका घेत आंदोलनं केली होती.

दरम्यान, फडणवीस यांनी या अगोदर नाईट लाइफच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. वरळीमधील एका पबमधील गर्दीचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडवीस यांनी, सोशल डिस्टन्सिंग वगैरे फक्त शिवजयंतीसाठी, नाईट लाईफचे तर आदेश मिळालेत असा टोला लगावला होता.