विष्ठा उचलण्याच्या त्रासापासून मुक्तीसाठी शक्कल; ५५ कोटींच्या घरात उलाढाल; पशूतज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

एका रम्य संध्याकाळी मरिन लाइन्सच्या समुद्र किनाऱ्यावरुन फिरत असताना अचानक कुत्र्यांची सभा भरल्याचे दिसेल आणि यात एक वेगळेपण असेल ते म्हणजे या सर्व कुत्र्यांनी डायपर घातलेले असतील. अशा डायपरवाल्या कुत्र्यांची सभा लवकरच मरिनलाइन्स परिसरात भरण्याची शक्यता आहे. कारण यापुढे जर पाळीव कुत्र्याने या परिसरात विष्ठा केली तर त्याच्या मालकाला दंड बसणार आहे. यामुळे काही नसले तरी कुत्र्यांच्या डायबरच्या बाजाराला तेजी येणार आहे.

प्रत्येक कुत्र्याच्या गरजेनुसार व त्याच्या शरीरयष्टीनुसार विविध आकारांचे डायपर सध्या ऑनलाइन बाजारात उपलब्ध आहेत. यातील एका डायपरची किंमत ४५ रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत आहे. या डायपर्सला सध्या मोठय़ा प्रमाणावर मागणी असून गेल्या आर्थिक वर्षांत या डायपर्सची उलाढाल ही ५५ कोटींच्या घरात नोंदविली गेली आहे. या वर्षी ही उलढाल ९० कोटींच्या घरात जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अनेकदा लोक हौसेने श्वान पाळतात. मात्र यानंतर त्याची काळजी घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींना श्वान मालक कंटाळतात. यातील कंटाळण्याजोगी मुख्य बाब म्हणजे त्यांची विष्ठा. अशावेळी अनेक श्वान मालक कुत्र्यांना डायपर घालणे पसंत करतात. यात वापरा आणि फेकून द्या अशा डायपर्ससोबतच पुन: वापर करता येणारे डायपर्सही उपलब्ध आहेत. पण वापरा आणि फेकून द्या, अशा डायपर्सनाच सर्वाधिक मागणी आहे. अ‍ॅमेझॉन, ई-बे, फ्लिपकार्ट अशा संकेतस्थळांवर हे डायपर्स सवलतींच्या दरात उपलब्ध आहेत.

कुत्र्याला विष्ठा करण्यासाठी अनेकदा घराबाहेर न्यावे लागते. ते मोकळे वातावरण कुत्र्याला विष्ठा करण्यास पुरक असते. मात्र बाहेर होणारी घाण आणि घरातही घाण कोण आवरणार, असे प्रश्न निर्माण झाल्यामुळे कुत्र्यांच्या डायपर बाजारात तेजी आल्याचे पशुवैद्यकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात कुत्र्याला डायपर घालणे  चुकीचे असून यामुळे त्याला त्वचेचे आजार किंवा विषाणूसंसर्ग होण्याची भीती वाढते, असे निरीक्षण पशुवैद्यक डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष मनोहर अकोले यांनी नोंदविले आहे.

याशिवाय जे डायपर आपण कुत्र्यांना घालतो त्यात विशिष्ट प्रकारची रासायनिक द्रव्ये वापरलेली असतात. कुत्र्याला डायपर घातल्यावर तो अस्वस्थ होतो आणि ते काढण्याचा प्रयत्न तो करत असतो. या प्रयत्नात जर कुत्र्याने ते डायपर चावून खाल्ले तर त्यातील रासायनिक द्रव्यांचा अपाय कुत्र्याला होऊ शकतो, अशी भीतीही डॉ. अकोले यांनी व्यक्त केली.

कुत्र्याला डायपर घालण्यापेक्षा बाहेर गेल्यावर श्वानमालकाच्या हातात स्कूपर द्या जेणे करुन ज्या ठिकाणी कुत्र्याने विष्ठा केली आहे ती विष्ठा स्कूपरने उचलून ती कचऱ्यात फेकता येऊ शकते, असे डॉ. अकोले यांनी सुचविले. कुत्र्यांच्या विष्ठेने होणारी घाण रोखण्यासाठी दंड आकरण्याबरोबरच प्रशासनाने कुत्र्यांना चालण्यासाठी वेगळा मार्ग उपलब्ध करुन द्यावा त्या मार्गावर दर आकारुन विष्ठा करण्यासाठी कुत्र्याला नेले जाऊ शकते. म्हणजे नको त्या ठिकाणी घाण होण्यापेक्षा एकाच ठिकाणी घाण होईल व ती स्वच्छ करणेही शक्य होईल अशी सूचनाही डॉ. अकोले यांनी केली. कुत्र्याच्या डायपरवर खर्च होणारा पैसा जर रस्त्यावरील कुत्र्यांच्या प्रश्नांसाठी खर्च झाला तर कुत्र्यांच्या अनेक प्रश्नांवर उत्तरे मिळतील असेही ते म्हणाले.