पालिकेच्या विभागातील निम्मी पदे रिक्त

मुंबई : उपद्रवी भटक्या कुत्र्यांची धरपकड करण्यासाठी पालिकेकडे केवळ एक, तर कंत्राटदाराची तीन श्वान वाहने असून पालिकेच्या श्वान नियंत्रण विभागात केवळ ५० टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका अपयशी ठरू लागली आहे.

भटक्या कुत्र्यांविषयीच्या तक्रारीचे निवारण आणि त्यांचे निर्बीजीकरण या कामासाठी कार्यरत असलेल्या मुंबई महापालिकेच्या श्वान नियंत्रण विभागामध्ये एकूण १३७ पदे असून त्यापैकी ६९ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तर उर्वरित ६९ पदे रिक्त आहेत. या विभागातील निम्मी पदे रिक्त असल्याने श्वानांचा बंदोबस्त करण्यात अडथळे येत आहेत.

या पार्श्वभूमीवर पालिकेने सात परिमंडळांसाठी प्रत्येकी एक अशी सात वाहने मनुष्यबळासह कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मनुष्यबळासह तीन वाहने उपलब्ध व्हावीत यासाठीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही वाहने आणि मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा प्रभावीपणे बंदोबस्त करता येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेचे एक आणि कंत्राटदारांच्या तीन श्वान वाहनांच्या माध्यमातून सध्या उपद्रवी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. जानेवारी २०१६ ते जुलै २०१८ या काळात श्वान वाहनांच्या ३,७४४ पाळ्यांमध्ये ९,६३७ कुत्र्यांना पकडण्यात आले. तर ऑगस्ट २०१८ मध्ये १३५ पाळ्यांमध्ये २६७ भटक्या कुत्र्यांची धरपकड करण्यात आली होती. पकडलेल्या कुत्र्यांना अशासकीय संस्थांच्या श्वानगृहांमध्ये १० दिवस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. रेबिजची लक्षणे आढळणाऱ्या कुत्र्याला रेबिज प्रतिबंधक लस टोचून पुन्हा मूळ ठिकाणी सोडून देण्यात येते, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

वर्ष                     श्वान निर्बीजीकरण  शस्त्रक्रिया

२०१४                         ७,२३६

२०१५                         ६,४१४

२०१६                        ११,९६७

२०१७                         २४,२९०

२०१८                          २१,८८६

नोव्हे. २०१९ पर्यंत       १७,५०६