तिकीट आणि मासिक पास यांच्या विक्रीचा आधार घेऊन मध्य रेल्वेने काढलेल्या अव्वल दहा स्थानकांच्या यादीत डोंबिवली अग्रक्रमावर आहे. डोंबिवली स्थानकातून दर दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ठाणे स्थानकातील प्रवाशांपेक्षा कमी असली, तरी डोंबिवलीच्या प्रवासी संख्येच्या वाढीचा वेग जास्त आहे. या स्थानकातील प्रवाशांची संख्या दर दिवशी सरासरी अडीच लाखांच्या आसपास पोहोचली आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामांचे आगार असलेल्या दिवा स्थानकाने या अव्वल दहा स्थानकांच्या यादीत दहावे स्थान पटकावले आहे. दिवा स्थानकातील प्रवासी संख्येत एका वर्षांतच १२ लाखांची वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात डोंबिवली स्थानकातून विकल्या गेलेल्या तिकिटांची आणि मासिक पासची संख्या ६४,६०,३५९ एवढी होती. म्हणजेच या महिन्यात गेल्या वर्षी दर दिवशी सरासरी २.१५ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा जुलै महिन्यात ही संख्या ७४,५७,४४३ एवढी आहे. म्हणजेच सध्या या स्थानकातून दर दिवशी प्रवास करणाऱ्यांची संख्या सरासरी २.४८ लाख एवढी आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यातील या प्रवासी संख्येत ३३ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची भर पडली आहे. प्रवासी संख्येचा हा दर १५.४४ टक्के एवढा आहे. या तुलनेत ठाण्यातील प्रवासी संख्येचा दर १४.८७ एवढा आहे.
या दहा स्थानकांमध्ये डोंबिवली, ठाणे, कल्याण, घाटकोपर, कुर्ला, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी या स्थानकांचा समावेश असून दहाव्या स्थानावर दिवा स्थानक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवा स्थानकातून तब्बल १२ लाख जास्त प्रवाशांनी प्रवास केला. बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकामांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिवा स्थानकाची ही झेप कळवा, मुंब्रा आणि ठाणे स्थानकातील काही प्रवाशांच्या कृपेने झाल्याचे मध्य रेल्वेचे अधिकारी सांगतात. मध्य रेल्वेच्या तिकीट दराचा एक टप्पा दिवा स्थानकापर्यंत आहे. त्यामुळे ठाणे, कळवा व मुंब्रा येथील प्रवासी दिव्यापासून मासिक पास अथवा तिकीट काढणे पसंत करतात. त्यामुळे दिवा स्थानकातील प्रवाशांचा आकडा फुगलेला दिसतो, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दहा अव्वल स्थानके (ऑगस्ट २०१५ पर्यंत)
स्थानक प्रवासी संख्या
डोंबिवली ३,५७,६१,०९५
ठाणे ३,४८,८६,६७०
कल्याण २,९६,०१,६१७
घाटकोपर २,६८,४५,६४३
कुर्ला २,२९,९६,२९५
सीएसटी २,२६,२८,४३३
मुलुंड २,२५,४६,८७४
भांडुप १,५८,३९,४३६
विक्रोळी १,४३,२८,१०८
दिवा १,२७,९६,२१८