राज्यात करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे या प्रमुख शहरांसह अन्य शहरांमध्येही करोनाचे रूग्ण मोठ्याप्रमाणावर आढळून येत आहे. राज्य सरकार दिवसेंदिवस निर्बंध अधिक कडक करत असताना व करोनाच्या पार्श्वभू्मीवर असलेल्या नियमांचे काटकोर पालन करणे बंधनकारक केलेल असुनही, अनेकांना याचे फारसे गांभीर्य दिसत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे.

कल्याण डोंबिवलीत करोनाबाधितांची संख्या वाढत असताना देखील, या ठिकाणी काहीजण बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. विवाहसमारंभ, अन्य  सार्वजनिक कार्यक्रम, सभा इत्यादींवर निर्बंध असतानाही या ठिकाणी चक्क एका बैलाचा वाढदिवस धुमधडाक्यात फटाके फोडून साजरा करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी करोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.

डोंबिवली पश्चिममधील रेतीबंदर रोड परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी करोना संदर्भातील कोणत्याही नियमांचे पालन केले गेले नाही. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते, सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला होता. हे पाहता संबंधित बैलाच्या मालकाविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल केला गेला.