गेल्या आठवडय़ापासून डोंबिवलीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता डोंबिवली पश्चिम भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा सुरळीत करताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना रात्रीचे साडेआठ वाजले.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक संध्याकाळच्या वेळेत मोठय़ा प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतात. वीज नसल्याने दुकानांमध्ये काळोख होता. त्यामुळे खरेदी करताना ग्राहक व व्यापारी यांना अडथळे येत होते. रस्त्यावर मिट्ट काळोख असल्याने व त्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी असल्याने नागरिक त्रागा करीत चालताना दिसत होते.  
महावितरणच्या अधिकाऱ्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
गेल्या आठवडय़ात शनिवारी पाच तास याच भागाचा वीज पुरवठा पाथर्ली येथे वीज वाहिनीत बिघाड झाल्याने बंद पडला होता. पालिकेतर्फे जागोजागी रस्ते खोदून ठेवले होते. त्यामुळे वीज वाहिन्या, दूरसंचार विभागाच्या वाहिन्या जेसीबीने तोडून टाकल्या आहेत. त्याचा फटका या कंपन्यांबरोबर नागरिकांना बसत आहे.