विमानसेवा म्हटलं की आरामदायी आसने, खमंग पदार्थ, उत्तम मनोरंजनाची सोय आणि ऐश्वर्य संपन्न सुविधा हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र सध्या देशांतर्गत विमान यात्रेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने हवाई यात्रा सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला आहे. यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत सुमारे ३१०४ प्रवाशांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. यात अवघ्या डिसेंबरमध्ये १०९१ तक्रारी करण्यात आल्या आहेत.
नुकत्याच नागरीउड्डाण मंत्रालयाने जाहीर केलेल्या २०१५च्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. यात दहा विमान कंपन्यांविरोधात नागरी उड्डाण मंत्रालयाकडे प्रवाशांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. प्रवाशांनी देशांर्गत विमानसेवा विरोधात नोंदवलेल्या विमानसेवेत एअर इंडिया, गो-एअर, जेट एअरवेज, एअर कोस्टा, एअर पेगासस, एशिया, स्पाईसजेट, तृजेत आणि विस्तार आदी विमान कंपन्यांचा समावेश आहे.
गेल्या जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत प्रवाशांनी मोठय़ा प्रमाणात तक्रारी नोंदवल्या आहेत. यात जुलै महिन्यात ८०२, ऑगस्ट ७१२, सप्टेंबर ७५०, ऑक्टोबर १०८०, नोव्हेंबर ९३३ तर डिसेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे १०९१ तक्रारीं नोंदवण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांकडून नोंदवण्यात येणाऱ्या तक्रारींचा ओढा झपाटय़ाने वाढत असल्याने देशांर्गत विमानसेवेचा दर्जा कमी होत असल्याची टीका प्रवाशांकडून केली जात आहे.

कारणे..
या तक्रारींमध्ये विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ७.७ टक्के प्रवाशांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. तर प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या सेवेतील त्रुटीविरोधात २७.१ टक्के, विमानउड्डाण रखडल्या प्रकरणी २८ टक्के, तिकीट परत करताना होणारी गैरसोयबाबत ३.५ टक्के, प्रवासाचे भाडे विरोधात ०.७ आणि इतर प्रकरणात ३३.७ टक्के प्रवाशांनी तक्रारी नोंदवल्या असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.