गुजराती खवय्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांची शक्कल; भारतीय खाद्यसंस्कृतीशी जवळीक साधणाऱ्या पदार्थावर भर

वडापाव, वडासांबर, डोसा-उथप्पा अशा भारतीय पदार्थाऐवजी बर्गर, पिझ्झा, सॅण्डविच अशा पाश्चात्त्य पदार्थाच्या खाबुगिरीकडे वळलेल्या खवय्यांसाठी एकीकडे डॉमिनोज, पिझ्झाहट, मॅकडोनल्ड्स अशा साखळी रेस्टॉरंटच्या शाखा रस्तोरस्ती उभ्या राहू लागल्या असतानाच आता आणखी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांनी आपल्या पदार्थाचे ‘देशीकरण’ करण्यासही सुरुवात केली आहे. विशेषत: उपवासाच्या दिवसांत पाश्चात्त्य पदार्थ टाळणाऱ्यांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी या कंपन्या उपवासाला चालू शकणाऱ्या खाद्यघटकांचा वापर करून पदार्थ तयार करू लागल्या आहेत. ‘डॉमिनोज’ने अशाच प्रकारे शिंगाडय़ाच्या पिठापासून बनवलेला आणि साबुदाण्याचे टॉपिंग असलेला फराळी पिझ्झा आपल्या मेन्यू कार्डवर झळकवला असून ‘सबवे’ने चटपटा चना आणि तंदुरी चिकनच्या चवीचे तिखट झणझणीत सॅण्डविच आणून आपल्या पदार्थाचे भारतीय मांसाहारींना नवीन पर्याय दिला आहे.

भारतात धंदा वाढविण्यासाठी पाश्चात्त्य खाद्यपदार्थाच्या अनेक ‘ब्रँडेड’ अमेरिकी कंपन्यांनी येथील खाद्यसंस्कृतीनुसार अनुसरून नवनवीन प्रकारचे पदार्थ ‘मेन्यू कार्ड’वर आणण्यास सुरुवात केली आहे. येत्या नवरात्रोत्सवात ‘डॉमिनोज’ शिंगाडय़ाच्या पिठाचा आणि साबुदाण्याच्या टॉपिंगचा फराळी पिझ्झा सुरू करणार आहे. नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्या गुजराती, मारवाडी समाजाला आकर्षित करण्याच्या दृष्टीने कंपनीने ही योजना आखली आहे. त्यासाठी अनेक गुजरातीबहुल भागांमध्ये संपूर्णत: शाकाहारी शाखा सुरू करण्यात येणार असल्याचेही या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, तर मांसाहारींना आकर्षित करण्याकरिता गेल्या १५ वर्षांत भारतात नावारूपाला आलेल्या ‘सबवे सॅण्डविच’ या अमेरिकेतील कंपनीने चटपटा चना आणि चिकन तंदुरी या भारतीय संस्कृतीतील खाद्यपदार्थाचे सॅण्डविच सुरू केले आहे.

नोकरदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी पदार्थाचे आकार कमी करून कमी किमतीत दिल्याचा आव आणला जात आहे. शाकाहारी आणि मांसाहारी असे पर्यायही देण्यात आले. केएफसी हे विशेषत: मांसाहार, त्यातही चिकन खाणाऱ्यांसाठी असले तरी शाकाहारी ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शाकाहारी बर्गरही उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर खवय्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी ‘राइस बाऊल’ही आणला आहे. सध्या या कंपन्यांमध्ये संयुक्तिक (कॉम्बो) प्रकाराला मागणी आहे. यात बर्गर, फ्रेंच फ्राइज आणि कोल्ड्रिंकचा समावेश असतो.

सवलतींचेही गाजर

डॉमिनोज आणि ‘पिझ्झा हट’ खाद्यपदार्थावर ‘ऑफर्स’ही देत आहेत. दोन्ही कंपन्यांतर्फे सध्या ४००च्या खरेदीवर १०० रुपयांची सूट दिली जात आहे, एकावर एक मोफतकिंवा अध्र्या तासात घरपोच सेवा न मिळाल्यास पदार्थ मोफत, अशा सवलतीही दिल्या जात आहेत.

आमच्या इथेही शाखा

मोठमोठय़ा मॉलमध्ये पाश्चात्त्य खाद्यपदार्थाची दुकाने मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र आता शहरी ग्राहकांनंतर उपनगरातील या भागाकडे पाश्चात्त्य खाद्यकंपन्या वळत आहेत.  कल्याण, वसई, विरार, बदलापूर या भागांमध्येही मोठय़ा प्रमाणात मॅकडोनल्ड आणि डॉमिनोजच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत.