News Flash

कुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी

कौसर बहार या प्रेयसीशी आपल्याला लग्न करायचे आहे त्यामुळे आपल्याला तुरुंगवासातून ४५ दिवसांची रजा मिळावी असा अर्ज कुख्यात डॉन अबू सालेमने केला आहे

अबू सालेम (संग्रहित छायाचित्र)

कुख्यात डॉन अबू सालेमने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. मला लग्न करायचे आहे त्यामुळे ४५ दिवस सुट्टी मिळावी असे अबू सालेमने अर्जात म्हटले आहे. कौसर बहार या त्याच्या नव्या प्रेयसीशी तो लग्न करणार आहे अशी माहिती समोर आली आहे. कौसर बहार आणि अबू सालेम यांचा निकाह करण्यासाठी ५ मे ही तारीख नक्की करण्यात आल्याचेही समजते आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मुंबईतील ९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेमचा हात आहे. तसेच खंडणी, हत्या यांसारखी प्रकरणेही त्याच्याविरोधात सुरु आहेत. मोनिका बेदी या अभिनेत्रीसोबत असलेले त्यांचे प्रेमसंबंधही जगाने जवळून पाहिले आहेत. आता हाच कुख्यात डॉन निकाह करण्यासाठी सुट्टी मागतो आहे. १९९३ च्या स्फोट प्रकरणातील सहभागासाठी टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नवी मुंबईतील तळोजा या ठिकाणी असलेल्या तुरुंगात तो शिक्षा भोगतो आहे. मी अबू सालेमचा आवाज ऐकूनच त्याच्या प्रेमात पडले असे मोनिका बेदीने म्हटले होते. तसेच मोनिका बेदीला चित्रपट मिळवून देण्यातही अबू सालेमचा मोठा हात होता. ‘जानम समझा करो’, जोडी नंबर १ या सिनेमांमधील भूमिका मिळवून देण्यात अबू सालेमने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र अटक झाल्यानंतर आपण अबू सालेमला कधीही भेटलो नाही असे मोनिकाने सांगितले.

मोनिका बेदीसोबतचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यावर आता अबू सालेमच्या आयुष्यात कौसर बहार नावाची २७ वर्षांची तरुणी आली. तिच्याशी निकाह करायचा असल्याने अबू सालेमने ४५ दिवसांच्या रजेचा अर्ज केला आहे.

कोण आहे अबू सालेम?

अबू सालेमचे पूर्ण नाव अबू सालेम अब्दुल कय्युम अन्सारी असे आहे. अकिल अहमद आजमी, कॅप्टन, अबू सामान या टोपण नावांनीही तो गुन्हेगारी जगतात ओळखला जातो. अबू सालेमचे वडिल एक प्रतिथयश वकील होते. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अबू सालेम गुन्हेगारी जगताकडे वळला. सुरुवातीला तो मॅकेनिक म्हणून मोटार दुरुस्तीचे काम करत असे. त्यानंतर ८० च्या दशकात तो मुंबईला आला आणि टॅक्सी चालवू लागला.

मुंबईत त्याची भेट दाऊदशी झाली. त्याने डी कंपनीसोबत काम करण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला. ९३ च्या स्फोटानंतर अबू सालेम दुबईला पळाला. तिथे तो दाऊदचा भाऊ अनिससोबत काम करु लागला. खंडणीसाठी धमकावणे, हत्या अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याचा हात आहे. बॉलिवूडमधल्या निर्माता, दिग्दर्शकांना धमकीचे फोन करून तो खंडणीचे पैसे उकळत असे. त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांमध्येही त्याची दहशत होती. निर्माते आणि बांधकाम व्यावसायिक कॅप्टन या त्याच्या नावामुळे चळाचळा कापत असत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 7:54 am

Web Title: don abu salem wants to marry he applies parole for 45 days
Next Stories
1 धक्कादायक! जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या?
2 पेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका
3 एस. बंगारप्पांचे पुत्र एकमेकांविरुद्ध
Just Now!
X