कुख्यात गुंड अरूण गवळीला पुन्हा फरलोवर २८ दिवसांसाठी तुरुंगाबाहेर सोडण्याच आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्याला फरलो मंजुर केला. काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीच्या लग्नानंतर तो तुरुंगात परतला होता. तसंच आपल्या आजारी पत्नीच्या सेवेसाठी त्याला ४५ दिवसांचा पॅरोल मिळाला होता.

फरलो रजा मिळावी यासाठी गवळीनं ३० नोव्हेंबर २०१९ रोजी तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला होता. परंतु यावर सुनावणी झाली नव्हती. दरम्यान, मंगळवारी यावर सुनावरणी पार पडली. यापूर्वी ८ वेळात्याला पॅरोलवर कारागृहाबाहेर सोडण्यात आलं होतं. याकालावधीत त्यानं कोणत्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा युक्तीवाद त्याच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला होता.

यापूर्वी रजा संपल्यानंतर न्यायालयानं अरूण गवळीला नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जाऊन आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं. पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे अरुण गवळी जवळपास ४५ दिवसांसाठी पॅरोलवर नागपूर कारागृहातून बाहेर आला होता. एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २७ एप्रिलला त्याने कारागृहात हजर होणं अपेक्षित होतं. पण याचवेळी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे अरुण गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाने अर्ज स्वीकारत १० मे पर्यंत अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. यानंतरही अरुण गवळीला वाढ देत २४ मे पर्यंत पॅरोल देण्यात आला होता. दरम्यान पॅरोलवर बाहेर असताना अरुण गवळीची योगिताचा विवाहसोहळा पार पडला. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे अत्यंत साध्या पद्धतीने दगडी चाळीमध्येच हा विवाह सोहळा पार पडला. योगिता ही अभिनेता अक्षय वाघमारेसोबत विवाहबद्ध झाली.