एका वृत्तपत्राच्या कार्यालयात घडणाऱ्या व पत्रकाराच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘दोन स्पेशल’ या नव्या नाटकाचा पहिला प्रयोग २० जून रोजी शिवाजी मंदिर येथे सादर होणार आहे. नाटकाची निर्मिती अथर्व थिएटर आणि मिश्री थिएटर यांची असून ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर हे नाटक आधारित आहे. अभिनेता जीतेंद्र जोशी यांना या नाटकाने ‘निर्माता’ही नवी ओळख मिळणार असून अभिनेत्री गिरिजा जोशी या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे.
नाटकाचे लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी ‘दोन स्पेशल’बाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, वृत्तपत्रातील उपसंपादकाच्या आयुष्यात घडलेल्या एका वादळाची ही कथा आहे. या उपसंपादकाने जपलेली मूल्ये/तत्त्वे आणि त्याचे प्रेम यातून उभा राहिलेला संघर्ष आणि नाटय़ यात पाहायला मिळेल. नाटकाचे कथानक १९८९-९०च्या काळातील आहे. वृत्तपत्रे, तेथे काम करणारे पत्रकार, कर्मचारी यांच्यासाठी हा मोठय़ा बदलाचा, संक्रमणाचा काळ होता. त्या पिढीचे प्रतिनिधित्व हे नाटक करते. नाटकाच्या निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असलेल्या ‘अथर्व थिएटर’चे संतोष काणेकर म्हणाले, आमच्या निर्मिती संस्थेने रंगभूमीवर नाटक सादर करताना नेहमीच वेगवेगळ्या विषयांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ‘दोन स्पेशल’ हे नाटकही असेच आहे. पत्रकाराचे आयुष्य, ‘त्या’ रात्री एका बातमीवरून सुरू झालेला प्रवास आणि त्यातून पुढे घडणाऱ्या घटना यातून हे नाटक उलगडत जाते. जितेंद्र जोशींनी सांगितले, नाटय़ निर्मितीत उतरावे, असे मनापासून वाटत होते. हमोंच्या या कथेने मी भारावून गेलो. ही गोष्ट मला आवडली. मग नाटय़निर्मितीची सुरुवात या नाटकापासूनच करावी या उद्देशाने हे नाटक काणेकर यांच्या बरोबर करायचे ठरविले. या नाटकाचे खास वैशिष्टय़ म्हणजे नाटकात पाश्र्वसंगीत नाही तर पाश्र्वध्वनीचा वापर केलेला आहे. या आवाजाच्या साहाय्याने वृत्तपत्राचे कार्यालय, वृत्तपत्राचा छापखाना आणि तो काळ उभा केला आहे. नाटकाचे नेपथ्य व प्रकाशयोजना प्रदीप मुळ्ये यांची असून ध्वनी रेखाटन व वेशभूषा अनुक्रमे अनमोल भावे व दीपा मेहता यांची आहे.