अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सॅनहोजे, दुबई आणि सिंगापूर येथे झालेल्या वादग्रस्त विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून मिळालेली आर्थिक मदत साहित्य महामंडळाला राज्य शासनाकडे परत करावी लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली राज्य साहित्य व संस्कृती मंडळाला प्रश्नांचे एक निवेदन देण्यात आले आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या देणगीचा वापर विश्व साहित्य संमेलनासाठी गेलेल्या ‘फुकट फौजदारां’ची तिकिटे काढण्यासाठी झाल्याचे सांगण्यात येते.    
चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून महामंडळाला २५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली होती. मात्र विश्व मराठी साहित्य संमेलन घटनाबाह्य असल्याने महामंडळाला दिलेली ही देणगी राज्य शासनाला परत करण्याची नामुष्की महामंडळावर ओढविली होती. यावेळी घटनेत केलेल्या बदलांना धर्मादाय आयुक्तांकडून मान्यता मिळेपर्यंत विश्व मराठी साहित्य संमेलनास अनुदान दिले जाणार नाही, असे पत्र महामंडळाला दिले.
साहित्य महामंडळाची या पूर्वीची विश्व मराठी संमेलने सॅनहोजे, दुबई, सिंगापूर येथे झाली होती. टोरांटोसाठी लावलेल्या न्यायानेच महामंडळाकडून मागील रक्कम परत मागितली आहे का,  ती रक्कम शासनाकडे जमा झाली का, नियमबाह्य वर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती माहिती अधिकाराखाली मागविली आहे.