टाळेबंदीतही आनंदाचा अनुभव

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव, टाळेबंदी यांमुळे सर्वत्र अनिश्चितता, अस्वस्थता भरून राहिलेल्या वातावरणात एक मोठा आनंदाचा क्षण जाधव कुटुंबीयांना अनुभवता आला. तो क्षण होता, त्यांच्या १६ वर्षांच्या मुलाला जीवनदान देणाऱ्या दात्याच्या ऑनलाइन भेटीचा.

तीन वर्षांपूर्वी दिग्दर्शक रवी जाधव यांचा मुलगा अंश याला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्याच्यावर मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. मात्र बोन मॅरो प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर दात्याचा शोध सुरू झाला. अंशवर प्रत्यारोपण करण्यासाठी योग्यम् दाता मिळविण्यासाठी अगदी जर्मनी, सिंगापूरपासून आम्ही शोधाशोध करत होतो. परंतु सर्व गुणसूत्रे जुळून येणारा एकही दाता मिळत नसल्याने आमची नुसतीच धावपळ सुरू होती. दात्री संस्थेच्या माध्यमातून दाता मिळाला आणि आम्ही बंगळूरुला उपचारासाठी दाखल झालो. ‘न्यूड’ चित्रपटाचे प्रदर्शन आणि अंशचे उपचार एकाच वेळेस सुरू असल्याने मी वेगळ्याच मन:स्थितीत होतो. अंशवर यशस्वी प्रत्यारोपणही झाले. परंतु हा देवदूत कोण आहे, हे जाणून घेण्याची फारच इच्छा होती, असे रवी जाधव सांगतात.

अंशला वाढदिवसाची भेट म्हणून ऑनलाइन कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. दाता आणि रुग्णाची अशी प्रथमच ऑनलाइन भेट होत असल्याचे दात्रीने सांगितले.  अंशवर उपचार करणारे बंगलोरच्या ‘मुझुमदार शॉ कॅन्सर केंद्रा’चे डॉ. सुनील भट, अंशचे पालक, दाता मोनीशचे कुटुंब ‘दात्री’ या संस्थेसोबत सहभागी झाले. ‘दात्री’ ही रक्तातील स्टेम सेल दात्यांची नोंदणी करणारी संस्था आहे. ‘थोडय़ा वेळाची ही ऑनलाइन भेट आमच्यासाठी खूप आनंद देणारी ठरली. माझ्या मुलाला नवे जीवन देणारा दाता मुंबईचाच आहे, हा आश्चर्यकारक धक्का होता. अंशचा वेगळा वाढदिवस कायम आठवणीत राहील,’ असे अंशची आई मेघना आर्वजून सांगतात.  तर, माझ्यासाठीही हा अनुभव फार वेगळा होता. पत्नीचा नकार होता. मात्र तरीही याची संपूर्ण माहिती घेतली असल्याने मी स्टेम सेल देण्याचा निर्णय घेतला होता. अंश आज पुन्हा नवे जीवन जगू शकतो, ही माझ्यासाठीही खूप आनंदाची गोष्ट असल्याचे मोनीश सांगतात.

दाता होण्यासाठी पुढाकार घ्या

बोन मॅरो किंवा स्टेम सेल देणे किती महत्त्वाचे आहे हे आम्हाला मुलाच्या वेळेस जाणवले. याबाबत जनजागृतीच नसल्याने दाता फारसे पुढाकार घेत नाहीत. परंतु आपल्यामुळे एक जीव वाचतो ही किती मोठी बाब आहे.

आम्ही पतीपत्नीने या केंद्रामध्ये नाव नोंदविले आहे. ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित असल्याने दाता होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जाधव कुटुंबीयांनी आणि दात्रीने केले आहे.

‘माझा जीव वाचविणाऱ्या सर्वानाच एकाच वेळी स्क्रीनवर पाहून माझ्याकडे आता शब्दच उरलेले नाहीत. मी खरेच खूप नशीबवान आहे. दोन वर्षांत माझी प्रकृती चांगलीच सुधारली आहे. बास्केटबम्ॉलही पुन्हा खेळतोय. या वर्षी दहावीची परीक्षा मी दिली आहे,’ असे अंश सांगतो.