विसर्जनाच्या दिवशी कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नका अशी सूचना मुंबईत महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांना केली आहे. नाच-गाण्यामुळे दाब येऊन पुलाचे आणखी नुकसान होऊ शकते. गणेश भक्तांनी पुलावर जास्तवेळ रेंगाळू नये. त्यांनी शांतपणे पुल पार करावा अशी सूचना महापालिका प्रशासनाने सर्वच गणेश मंडळांना केली आहे. मुंबईत मागच्या काही काळात पूल कोसळून जिवीतहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

दोन सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळाच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ही मुंबईतील गणेश मंडळांची मुख्य संघटना आहे. काही पुल बंद केल्यामुळे विसर्जन मार्गात बदल करण्यात आले आहेत. ती आमची मुख्य चिंता आहे. नव्या मार्गावर सरकारने सुरक्षा द्यावी. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी केली.

मुंबई महापालिकेने आम्हाला कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाच-गाणी करु नका सांगितले आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती लक्षात घेता समन्वय समितीने पोलिसांकडे प्रत्येक मंडळाच्या दहा मुलांना सुरक्षा व्यवस्था कशी हाताळायची त्याचे प्रशिक्षण द्यावे अशी विनंती केली आहे. गणेश मंडळांविरोधात ध्वनि प्रदूषणाचे जे गुन्हे आहेत त्याची कोर्टात जलदगतीने सुनावणी घ्यावी किंवा राज्य सरकारने ते गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.