News Flash

टाळेबंदीला भाग पाडू नका!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा; हॉटेल्स, मॉल्स प्रतिनिधींबरोबर बैठक

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरू केले आणि त्यानंतर सुमारे चार महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक टाळेबंदी लावण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले.

उद्धव ठाकरे यांनी आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.

गेल्या चार महिन्यांत सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्येसुद्धा जणू काही करोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे.

आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील. पुढच्या काळातदेखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. या वेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरू झाले आहे, त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.

अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, नियमांचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. आपण हे अर्थचक्र सुरू केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल त्यामुळे टाळेबंदीसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली

मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये त्यांना कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मुखपट्ट्या लावलेली नव्हती. तसेच सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव त्यांनी आपणास सांगितला होता. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेवून बसविणे, वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मुखपट्टी लावणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:32 am

Web Title: dont force the lockout chief minister uddhav thackeray warning abn 97
Next Stories
1 फौजदारी मानहानीच्या दाव्याची तरतूद रद्द करावी
2 ऐन सणात, एसटी आणखी तोट्यात
3 करबचतीसाठी गुंतवणूक नियोजनाचे मार्गदर्शन
Just Now!
X