पुढील १५ दिवस हे करोनाविरोधी लढाईतील कसोटीचे असून बाहेर पडून गर्दी करू नका, गावाला जाऊ नका, आहात तेथेच राहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांतील थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. करोनाविरोधातील लढाई ही महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. पुढील १५ दिवस कसोटीचे असून या काळात आपण घरी राहिलो- गर्दी केली नाही तर या संकटावर मात करता येईल. बरेच लोक भाजीपाला-अन्नधान्याच्या गाडय़ांचा वापर करून इतर राज्यांतून किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याचे आढळले आहे. ही चिंतेची बाब आहे. गर्दी करू नका, एका शहरातून-गावातून उठून दुसऱ्या गावी जाऊ नका, घरीच राहा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

देशात ८६० रुग्ण

देशात शुक्रवारी करोनाबळींची संख्या २० वर पोहोचली. दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या सुमारे शंभराने वाढून ८६० वर पोहोचली आहे. देशभरातील ७३ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.

जगभरात मृतांचा आकडा २५ हजारांवर

जगभरात करोनाचा थमान सुरूच असून, या विषाणूने बळी घेतलेल्यांचा आकडा शुक्रवारी २५,०६६ वर पोहोचला. आतापर्यंत ५,४९,३०३ जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी १,२८,६५४ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

ब्रिटनचे पंतप्रधान, आरोग्यमंत्र्यांनाही करोना

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. ‘गेल्या २४ तासांत करोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली आहेत. मात्र, मी करोनाविरोधातील लढयात सरकारचे नेतृत्व करतच राहीन’, असे ट्विट जॉन्सन यांनी शुक्रवारी केले. आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनाही करोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले.

अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

करोनाने जगात इटलीत सर्वाधिक ८,२२५ बळी घेतले. मात्र, सर्वाधिक ८५,७४९ रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. त्यापाठोपाठ चीन, इटली, स्पेन, जर्मनीमध्ये मोठय़ा संख्येत रुग्ण आढळले आहेत.

दहा महिन्यांच्या बालकास लागण

कर्नाटकमध्ये करोनाबाधितांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. त्यात दहा महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. या बालकाचे कुटुंब त्यास घेऊन केरळला गेले होते, असे समजते.