सभागृहातील कामकाजात गांभीर्याने भाग घ्या, आपापसात गप्पा मारायच्या असतील तर तुमच्या कार्यालयात जाऊन बसा, त्यासाठी सदनाचा वापर करू नका, अशा कानपिचक्या विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी थेट मंत्र्यांनाच दिल्या. त्यावर खजिल झालेल्या मंत्र्यांनी घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करीत पुन्हा अशी चूक होणार नाही, अशी हमी दिली.
पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात आमदारांनी केलेल्या मारहाणीची चर्चा रंगू लागली आहे. मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे सुनील केदार यांनी पुन्हा एकदा पोलीस साध्या वेशात आमदारांची टेहळणी करीत असल्याची बाब सदनाच्या निदर्शनास आणली. त्यामुळे अशा पोलिसांवर कोणाचा अंकुश आहे, अशी विचारणा केदार यांनी केली. त्यावर आपण असे कोणतेही आदेश दिले नसून गृहमंत्र्यांनी माहिती घेऊन सदनास सांगावे असे निदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले. मात्र त्याचवेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर आणि पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे हे तिन्ही मंत्री आपापसात चर्चा करीत होते. मंत्री महोदय चर्चेत इतके गुंग झाले होते, की विधानसभा अध्यक्षांसह संपूर्ण सभागृह आवाक् होऊन पाहत होते. कालांतराने गिरीष बापट यांनी संबंधित मंत्र्यांना समज देण्याची मागणी केली. शेवटी आपली चूक लक्षात आल्यानंतर अनिल देशमुख यांनी घडल्या प्रकराबद्दल चुकीची कबुली देत पुन्हा असे होणार नाही अशी हमी दिली.