गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना दिलेला भारतरत्न हा किताब काढून घ्यावा, अशी मागणी भाजप खासदार चंदन मित्रा यांनी केल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा शिवसेने आज चांगलाच समाचार घेताना. मात्र, सेन यांनी ‘राजकारणात आपले नाक खुपसू नये’, असा सल्लाही शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दिला आहे.
सेन हे जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ असून त्यांच्याकडून ‘भारतरत्न’सारखा पुरस्कार काढून घेणे योग्य नाही, असे मत उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वर्तमानपत्राच्या अग्रलेखात मांडले आहे.
अमर्त्य सेन हे अर्थतज्ज्ञ आहेत, मात्र या देशातील गरीबांना ते नक्की काय करतात यांबद्दल उत्सुकता आहे. या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. महागाई वाढत असून गरीबी दिवसेंदिवस वाढत आहे. हे मोदींमुळे झालेले नाही आणि अमर्त्य सेन नोबेल पारितोषिक विजेते असूनही त्यांच्याकडे या प्रश्नावर जालीम उपाय नाही, असंही ते पुढे म्हणाले.    
प्रत्येकाला आपली जबाबदारी पार पाडायला सांगितली आणि ‘राजकारणात नाक खुपसू नका’, असे म्हटले तर सेन यांची प्रतिक्रिया काय असेल, असा सवाल उध्दव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. असे असले तरी अमर्त्य सेन यांचे मोठेपण नाकारता येणार नाही.
त्यांच्याकडून भारतरत्न काढून घेण्याची मागणीही अयोग्यच आहे. प्रत्येकाने आपापल्या मर्यादा पाळायला हव्यात, असंही ठाकरे म्हणाले.
‘एक भारतीय नागरिक म्हणून मला देशाच्या पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांना पाहण्याची अजिबात इच्छा नाही’, अशा जळजळीत शब्दांत सेन यांनी मोदींवर टीका केली होती. त्यानंतर भाजप खासदार चंदन मित्रा यांच्या वक्तव्यानंतर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले तर हा पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे सेन यांनी स्पष्ट केले होते.