News Flash

सहज सफर : भन्नाट डोनावत!

खोपोली-पेण रस्त्यावर असलेले डोनावत धरण परिसर सध्या पर्यटकांनी फुलून गेला आहे.

पाऊसधारांनी चिंब होऊन हिरवाईची शाल पांघरून, रंगीबेरंगी रानफुलांनी नटलेली खोपोली म्हणजे पर्यटकांचे खास आकर्षण! उंचावरून कोसळणारा आणि झिम्माड आनंद देणारा झेनिथ धबधबा, आडबाजूला असला तरी आकर्षक असलेला आडोशी धबधबा आणि येथील निसर्गरम्य परिसर ही पर्यटकांची वर्षांसहल साजरी करण्याची प्रसिद्ध ठिकाणे. या नयनरम्य ठिकाणांच्या मांदियाळीत आता एक नवे नाव जोडले गेले आहे.. डोनावत धरण.

खोपोली-पेण रस्त्यावर असलेले डोनावत धरण परिसर सध्या पर्यटकांनी फुलून गेला आहे. पावसात धरणातून सांडव्यावाटे कोसळणाऱ्या पाण्यात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले या ठिकाणी वळतात. खोपोली रेल्वे स्थानकापासून १० किलोमीटर अंतरावर आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाजवळ असलेल्या या धरणाकडे जाण्यासाठी जास्त पायपीट करावी लागत नाही. पेणकडे जाणाऱ्या मार्गावरच डोनावत नदीवर हे आकर्षक धरण आहे.

धरणाच्या दिशेने जाताना खळखळ असा आवाज येतो आणि थोडय़ाच वेळात बंधाऱ्याचे नयनरम्य निसर्गदृश्य नजरेस पडते. नदीच्या मधोमध बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या एका बाजूस पाणी साठले आहे, तर दुसऱ्या बाजूस दगडातून वाहत पाणी खाली जात आहे. दगडावर मनसोक्त मारा करत हे पाणी खळखळ आवाज करते आणि पर्यटकांना साद घालते. बंधाऱ्याच्या पाण्यात पाय मोकळे सोडून बसले की एक थंडगार अनुभव मिळतो. पाणीही अतिशय दुधाळ आणि नितळ. अगदी आतमधील मासेही सहजपणे दिसतात.

बंधाऱ्यावरून अगदी सहजपणे चालत जाता येते. बंधाऱ्याची रुंदी अगदी तीन ते चार फूट असावी. चालताना एका बाजूला साचलेले नितळ जल आणि आणि दुसऱ्या बाजूला खळाळत वाहणारे दुधाळ जल पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. खडकावर आपटणाऱ्या पाण्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता येतो. चिंब भिजल्यानंतर येथील निसर्गसौंदर्य डोळय़ांत साठवून पावले परतीकडे निघतात.

खोपोलीजवळ झेनिथ धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही आणि आडोशीचा धबधबा जरा आडबाजूला असल्याने तिथे जाण्यासाठी पायपीट करावी लागते. मात्र डोनावतचे धरण हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठिकाण आहे, त्याशिवाय रस्त्याच्या अगदी जवळ असल्याने तिथे पोहोचण्यासाठी पर्यटकांना तंगडतोड करावी लागत नाही. त्यामुळे या आकर्षक आणि नयनरम्य ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे.

डोनावत धरण, खोपोली कसे जाल?

  • मुंबई सीएसटी स्थानकातून खोपोलीकडे जाण्यासाठी अनेक लोकलगाडय़ा आहेत. खोपोली स्थानकापासून १० किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. खोपोलीहून पेणकडे जाणाऱ्या एसटी बस आणि रिक्षा उपलब्ध आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पेणकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे गेल्यास तांबाटी गावाजवळ हे धरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 3:12 am

Web Title: donvat dam in khopoli
Next Stories
1 गॅलऱ्यांचा फेरा : दालनांचे कोमेजणे, उमलणे..
2 ..तर परीक्षा विभागाला टाळे लावू!
3 ..तर मनसेकडून शेतमाल विक्रीची व्यवस्था
Just Now!
X